पुणे : किशोरवयीन आणि तरुणांमध्ये टाइप २ मधुमेहाचे प्रमाण वाढत त्याच्याशी निगडित गुंतागुंतही खूप आधी उद्भवत आहे. साखरेचे प्रमाण नीट नियंत्रित न केल्यास त्याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होऊ शकतो. डायबेटिक रेटिनोपॅथीची समस्या वाढू लागली असून, तरुण मधुमेहींनी आपल्या डोळ्यांची अधिक काळजी घ्यावी, असा इशारा मधुमेह तज्ज्ञांनी दिला आहे.

मधुमेहाबाबत आता समाजामध्ये जागरूकता निर्माण झाली असली, तरी त्याच्या डोळ्यांवर होणाऱ्या परिणामांबाबत अद्याप पुरेशी माहिती नसल्याचे चित्र आहे. जागतिक मधुमेह दिन १४ नोव्हेंबरला असून, या निमित्ताने डायबेटिक रेटिनोपॅथी या तुलनेने दुर्लक्षित गुंतागुंतीकडे मधुमेहतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. भारतातील प्रौढ व्यक्तींमध्ये अंधत्वाच्या प्रमुख कारणांपैकी हे एक कारण आहे.

याबाबत दृष्टिपटलतज्ज्ञ डॉ. रश्मी काशीकर म्हणाल्या, की आमच्याकडे येणाऱ्या अर्ध्याहून जास्त मधुमेहींना त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो हे माहिती नसते, म्हणूनच अधिक जागरूकता आणि कृतीची आवश्यकता आहे. टाइप १ मधुमेहींना निदान झाल्यानंतर पाच वर्षांत दृष्टिपटलाची तपासणी करणे आवश्यक आहे, तर टाइप २ मधुमेहींनी निदान झाल्यावरच नेत्रतपासणी करून घ्यावी. विशेष करून मूत्रपिंडांसंबंधी किंवा इतर गुंतागुंत आणि डायलिसिसवर असलेल्या रुग्णांनी नियमितपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दृष्टिपटलाची तपासणी करून घ्यावी. तरुण भारतीय लोकसंख्येमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तरुण मधुमेहींनी वर्षातून एकदा तरी दृष्टिपटलाची तपासणी करून घ्यावी. तरुण मधुमेहींमध्ये जास्त काळ रक्तातील साखरेचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त असल्याने डायबेटिक रेटिनोपॅथीची तीव्रता आणि त्याच्याशी निगडित गुंतागुंतींची शक्यतादेखील वाढते.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, टाइप १ व टाइप २ निदान झालेल्या २५ वर्षांखालील मधुमेहींना तरुण मधुमेही समजले जाते. याबाबतीत जागरूकतेचा अभाव लक्षात घेता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने आम्ही विशेष करून वस्त्यांमध्ये निदानचाचण्या करीत आलेलो आहोत. सध्या पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरातील वस्त्यांमध्ये डोळ्यांच्या तपासणीसाठी आमच्या मोबाइल व्हॅन कार्यरत आहेत. दररोज ३० ते ४० जणांची नेत्रतपासणी केली जाते, असे एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. कुलदीप डोळे यांनी सांगितले.

डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय?

साखरेचे प्रमाण हे सातत्याने जास्त असते तेव्हा डोळ्यांमागच्या व प्रकाशाबाबत संवेदनशील असलेल्या दृष्टिपटलातील छोट्या रक्तवाहिन्यांना हानी पोहोचू शकते. या स्थितीला डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात. दृष्टिपटलातील रक्तवाहिन्यांना हानी पोहचल्याने कालांतराने दृष्टी धूसर होणे, डोळ्यात रक्तस्राव, डोळ्यांसमोर काळे ठिपके दिसणे किंवा उपचार न केल्यास अंधत्वही येऊ शकते. यात लवकर निदान व वेळेवर उपचार महत्त्वाचे असतात. मात्र, अनेकांना या स्थितीबाबत माहिती नसल्याने ही स्थिती पुढील टप्प्यात पोहोचेपर्यंत उपचार होत नाहीत.