पुणे : शहरात पावसामुळे काही भागांत पूर आला होता. पुराच्या पाण्यामुळे या भागांमध्ये जलजन्य आजारांसह कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. पावसामुळे साथरोगांचा प्रसार वाढलेला असतानाच आता पुरामुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने पूरग्रस्त भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरात प्रामुख्याने सिंहगड रस्त्यावरील नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. खडकवासला धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. आता पुराचे पाणी ओसरले असले तरी पूरग्रस्त भागांत अनेक ठिकाणी पाणी साचले असून, राडारोडाही पसरलेला आहे. या भागात जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या महिन्यात शहरात डेंग्यूची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, झिका आणि चिकुनगुनियाचे रुग्णही वाढत आहेत. आता या रुग्णसंख्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. निना बोराडे यांनी उपआरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे व डॉ. सूर्यकांत देवकर यांच्यासोबत पूरग्रस्त भागाची पाहणी केली. आरोग्यप्रमुखांनी सर्व सहायक आरोग्य अधिकारी, परिमंडळ व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. हेही वाचा - अभियांत्रिकी प्रवेशासाठी विक्रमी अर्ज, १ लाख ९१ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची अर्ज निश्चिती, अंतिम यादी ८ ऑगस्ट रोजी शहरातील पूरग्रस्त भाग सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगर, विठ्ठलनगर कॉलनी, निंबजनगर, आनंदनगर, शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट, पुलाची वाडी, कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयातील मंगळवार पेठ, भीमनगर परिसर. प्रतिबंधात्मक उपाययोजना डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप यांसारख्या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या भागामध्ये डासांची पैदास होऊ नये, यासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे डासांचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी धूरफवारणी करण्यात आली आहे. जलजन्य आजारांचा प्रसार होऊ नये यासाठी पिण्याचे पाणी निर्जंतुक करण्यासाठी मेडीक्लोर औषधाच्या बाटल्यांचे वाटप सुरू आहे. पुराच्या दूषित पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक औषधोपचार करण्याच्या सूचना महापालिकेच्या रुग्णालयांमधील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. हेही वाचा - आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला चार पदके पूरग्रस्त भागात नागरिकांना तत्काळ आरोग्य सेवा देण्यासाठी फिरती वैद्यकीय पथके नेमली आहेत. महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये मुबलक प्रमाणात औषधसाठा ठेवण्यात आलेला आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पूरग्रस्त भागात घरोघरी भेट देऊन रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. - डॉ. निना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका