पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका कायम आहे. २८ सप्टेंबरला ठाणे, रत्नागिरीसह कोकण विभागात आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहून अनेक भागांत मुसळधारांचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

 ‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले होते. त्यानंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली. मात्र, या काळात किनारपट्टीच्या भागाला त्याने तडाखा दिला. सोमवारी चक्रीवादळ निवळले आणि त्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र सध्या छत्तीसगड आणि ओडिसाच्या दक्षिणेला आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. सोमवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत महाबळेश्वर, बीड, िहगोली, लातूर, नांदेड, अकोला, बुलढाणा आदी भागांत पावसाची हजेरी होती.

या जिल्ह्य़ांसाठी इशारा

’ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्य़ांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

’मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, नगर, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, िहगोली जिल्ह्य़ांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

’कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्य़ांतही पाऊस होईल.

’२८ आणि २९ सप्टेंबरला पावसाचा जोर राहणार असून, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. विदर्भात चक्रीवादळाचा परिणाम नाही : ‘गुलाब’ चक्रीवादळाचा परिणाम आंध्रप्रदेशलगतच्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्य़ावर सर्वाधिक जाणवणार, हा हवामान विभागाचा अंदाज खोटा ठरला. सोमवारी विदर्भात या वादळाचा काहीच परिणाम दिसून आला नाही. नागपुरात दुपापर्यंत ऊन होते. विदर्भातील इतर जिल्ह्य़ांतही ढगाळ वातावरण होते.