पुणे : राज्यातील भीमा आणि उल्हास या दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या नद्यांतील वरडोळानामक माशाच्या पोटात सूक्ष्म प्लॅस्टिक आढळले आहे. उल्हास नदीतील माशांच्या तुलनेत भीमा नदीतील प्लॅस्टिक प्रदूषण जास्त असल्याचे संकेत नव्या संशोधनातून मिळाले असून, नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न अधोरेखित झाला आहे. तसेच माशाच्या पोटात प्लॅस्टिक आढळल्यामुळे अन्नसाखळी बाधित होत असल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे.
मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंडचे प्राचार्य डॉ. संजय खरात, मुंबईतील महाराष्ट्र महाविद्यालयाचे सचिन गोसावी, चेक रिपब्लिकच्या प्राग येथील चेक युनिव्हर्सिटी ऑफ लाइफ सायन्सेस येथील डॉ. प्रदीप कुमकर, चांदनी वर्मा, डॉ. लुकास कालौस यांनी उल्हास आणि भीमा नदीतील वरडोळा माशातील (शास्त्रीय नाव – ग्लोसोगोबियस गिरिस) सूक्ष्म प्लॅस्टिकबाबत संशोधन केले. या संशोधनाचा शोधनिबंध ‘एन्व्हायर्न्मेंटल पोल्युशन’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. उजनी धरणातील भिगवण आणि उल्हास नदीच्या कर्जत भागातून गोळा केलेल्या ३४ माशांच्या पचनसंस्थेतून एकूण ४७ सूक्ष्म प्लॅस्टिकचे कण आढळले. संशोधनामध्ये तपासलेल्या एकूण वरडोळा माशांपैकी ५२.९४ टक्के माशांच्या पोटात प्लॅस्टिकचे कण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे उल्हास नदीतील ३५.७१ टक्के माशांच्या पोटात, तर भीमा नदीतील ६५ टक्के माशांच्या पोटात सूक्ष्म प्लॅस्टिक आढळून आले.
रासायनिक विश्लेषणातून सूक्ष्म प्लॅस्टिकचे कण प्रामुख्याने पॉलीथिलीन आणि पॉलीप्रॉपलीन या प्रकारांचे असल्याचे सिद्ध झाले. त्यात प्रामुख्याने ५७.४ टक्के प्लॅस्टिकचे तुकडे, २९.८ टक्के फिल्म्स यांचा समावेश होता, तसेच ५१ टक्के कण हे निळ्या रंगाचे होते. हे प्लॅस्टिक मानवी टाकाऊ कचरा, पॅकेजिंग आणि दैनंदिन वापरातून नद्यांमध्ये मिसळलेल्या प्लॅस्टिकच्या विघटनातून तयार झाल्याचे स्पष्ट होते. वरडोळा मासा नद्यांच्या तळाशी असणाऱ्या गाळात खाद्य शोधत असल्याने पाण्यातील तळाशी जमा झालेले ३१६ ते ५८३ मायक्रॉन आकाराचे मध्यम स्वरूपाचे प्लॅस्टिकचे कण त्यांच्या शरीरात सहजपणे शिरकाव करत असल्याने संशोधनातून स्पष्ट झाले.
माशाची एखादी प्रजाती जलप्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी सरसकट ‘जैवनिदर्शक’ म्हणून वापरता येणार नाही. माशाच्या शरीरात प्लॅस्टिक साचणे हे केवळ नदीतील प्रदूषणावर अवलंबून नसून, माशांची राहण्याची जागा, खाण्याच्या सवयी आणि शारीरिक रचनेवरही अवलंबून असते. मात्र, नद्यांच्या अन्नसाखळीत प्लॅस्टिकचे वाढते प्रमाण अधोरेखित होत आहे. त्यामुळे नदीसंवर्धन, कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे संशोधकांनी सांगितले.
मायक्रो सीटी स्कॅनिंग करून शारीरिक रचनेचा अभ्यास
‘मायक्रो-सीटी स्कॅनिंग’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच वरडोळा माशाच्या जबड्याची आणि घशाची शारीरिक रचना अभ्यासण्यात आली. या माशाच्या जबड्यात अनेक बारीक, वळणदार दात असतात. त्याच्या घशातील रचना जलद गतीने भक्ष्य पकडण्यास अनुकूल असते. नद्यांच्या गढूळ पाण्यात खाद्य पकडताना आणि ते चघळताना प्लॅस्टिकचे कण या दातांमध्ये अडकून पुढे पचनसंस्थेत ढकलले जातात, असे दिसून आले.
संपूर्ण अन्नसाखळी बाधित
वरडोळा माशाच्या पोटात सूक्ष्म प्लॅस्टिक आढळणे चिंताजनक आहे. कारण, माशाच्या अन्नपचन प्रक्रियेत सूक्ष्म प्लॅस्टिकचे रूपांतर अतिसूक्ष्म प्लॅस्टिकमध्ये होते. पुढे माणसांनी, पक्ष्यांनी मासा खाल्ल्यास अतिसूक्ष्म प्लॅस्टिक त्यांच्या शरीरात जाते. त्यामुळे संपूर्ण अन्नसाखळीच बाधित होते. सूक्ष्म, अतिसूक्ष्म प्लॅस्टिकमुळे माणसाला विविध प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. यापूर्वी तिलापिया माशातही सूक्ष्म प्लॅस्टिक आढळले होते. त्यामुळे नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी व्यापक प्रयत्न आवश्यक आहेत. – डॉ. संजय खरात, संशोधक आणि मत्स्यतज्ज्ञ
