खड्डेही पालिकेच्याच माथी

रस्ते दुरुस्तीची जबाबदारी पालिका प्रशासनाची

 प्रत्येक मंडळाकडून अशा प्रकारे झालर मंडप (रनिंग मंडप) आणि कमानींची उभारणी केली जाते.

सार्वजनिक मंडळांनी जबाबदारी झटकली; रस्ते दुरुस्तीची जबाबदारी पालिका प्रशासनाची

गणेशोत्सवाच्या कालावधीत मंडपांमुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी ही सार्वजनिक मंडळांचीच असली, तरी मंडपांसाठी घेतलेले खड्डे अपवादानाचे मंडळांकडून बुजविण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्सवानंतर रस्त्यांची दुरुस्ती महापालिकेलाच करावी लागत असून त्या खर्चाचा भरुदडही महापालिकेला सहन करावा लागणार आहे.

विविध उत्सव आणि सणांसाठी सार्वजनिक रस्ते तसेच पदपथांवर मंडप आणि स्टेजची उभारणी करण्यात येते. सार्वजनिक समारंभाच्या आणि उत्सवांच्या प्रसंगी रस्ते किंवा पदपथांवर उभारण्यात येणाऱ्या मंडपासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करून महापालिकेने मंडप, स्टेज, कमानी आणि झालर मंडपांसाठी (रनिंग मांडव) धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार मंडळांना परवानगी देताना काही अटी आणि शर्तीही तयार करण्यात आल्या आहेत. मंडप आणि स्जेट उभारताना पदपथांवर खड्डे घेतले जाणार नाहीत, सार्वजनिक ठिकाणी खड्डे घेतल्यास किंवा इतर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास मंडळांकडून प्रती खड्डा दोन हजार रुपये दंड आकारला जाईल, असे धोरण आहे. सिमेंट काँक्रिट रस्त्यांवर खड्डे घेण्यात येऊ नयेत असेही स्पष्ट करण्यात आले असून मंडप परवान्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर तीन दिवसांच्या आत मंडळांनी स्वखर्चाने मंडप, रस्त्यावरील देखावे, विटांचे बांधकाम आणि अन्य साहित्य हटविण्याची जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

यंदा उत्सवासाठी मंडप आणि झालर मंडप टाकण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर खड्डे करण्यात आले आहेत. हे खड्डे बुजविण्याची जबाबादारी ही संबंधित मंडळांचीच आहे. मात्र उत्सवानंतर खड्डे बुजविण्याकडे मंडळे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हे काम महापालिकेलाच करावे लागते. हा खर्चाचा भरुदडही महापालिकेवरच पडत असून पंधरा क्षेत्रीय कार्यालये आणि पथ विभागाच्या समन्वयातून ही कामे महापालिकेतर्फे केली जाणार आहेत. गणेशोत्सवानंतर ही मोहीम प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार असून सहा ते सात दिवसांमध्ये रस्त्यांची डागडुजी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

डांबरी रस्त्यांवरील खड्डे डांबरयुक्त मिश्रणाने भरून घेण्यात येतील. तसेच सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवरील खड्डे इंटर लॉकिंग ब्लॉक्स बसवून बुजविण्यात येतील. क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून ही कामे करण्याचे नियोजन आहे.

-राजेंद्र राऊत, पथ विभाग प्रमुख, पुणे महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Road repair responsibility is municipal administration said by ganesh mandals