सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ

पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित उड्डाण पुलाच्या कामाला प्रारंभ झाला असून त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात पादचारी मार्ग, सायकल मार्ग काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उड्डाण पूल उभारणीचे काम तीन वर्षे सुरू राहणार असल्याने पर्यायी रस्त्यांअभावी या भागात तीन वर्षे वाहतूक कोंडीची ‘हमी’ मिळाली आहे. पर्यायी रस्ता नसल्याने या भागात पुढील काही वर्षे वाहतूक कोंडी होणार असल्याची कबुली महापालिकेचे अधिकारी देत आहेत. त्यातच उड्डाण पुलाचे काम निधीअभावी किंवा अन्य काही कारणांमुळे रखडल्यास वाहनचालक आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. डोणजे, खडकवासला, किरकिटवाडी, नांदेड सिटी, धायरी, वडगांव, सन सिटी, माणिकबागेकडे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. काही वर्षांपूर्वी नदीपात्रातून रस्ता पर्यायी रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार तो उखडून टाकण्याची वेळ महापालिकेवर आली. सध्या फनटाइम चित्रपटगृहालगतच्या कालव्यापासून विठ्ठलवाडीपर्यंत रस्ता विकसित करण्यात आला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला असला तरी रस्त्याची रुंदी कमी आहे. त्यातच माणिकबाग, सन सिटी, विठठ्लवाडीकडे जाण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे प्रमुख सिंहगड रस्त्यावरूनच वाहतूक होत असते. प्रामुख्याने राजाराम पुलापासून धायरीपर्यंत वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे. त्यातच पुलाच्या कामांना प्रारंभ झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडणार आहे.

उड्डाण पुलाचे काम पुढील तीन वर्षे चालणार आहे. त्यासाठी ११८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्या अंतर्गत राजाराम पुलाजवळील रस्त्याच्या एका बाजूचे पदपथ आणि सायकल मार्ग काढण्यास सुरुवात झाली असून उड्डाण पुलाचे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. उड्डाण पुलाचे खांब रस्त्याच्या मधोमध येणार असल्याने दुभाजकही काढावा लागणार आहे. सध्या सिंहगड रस्ता वाहनांसाठी अपुरा ठरत आहे. मात्र या कामामुळे पुढील किमान तीन वर्षे मोठय़ा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. उड्डाण पुलामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावा केला जात असला, तरी पुढील तीन वर्षे वाहनचालक आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

२.५ किलोमीटरचा उड्डाण पूल

प्रस्तावित उड्डाण पुलाची लांबी एकूण २.५ किलोमीटर एवढी आहे. दोन टप्प्यात उड्डाण पूल उभारण्यात येणार असून स्वारगेटहून वडगांव धायरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना कुठेही न थांबता थेट फनटाइम चित्रपटगृहापर्यंत जाता येणार आहे. तसेच वडगांव धायरीहून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका आहे. महापालिकेच्या प्रकल्प विभागाच्या आर्थिक आराखडय़ानुसार उड्डाण पुलासाठी १३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

दररोज सव्वालाख वाहनांची ये-जा

या रस्त्यावरून दररोज १ लाख २५ हजार वाहने ये-जा करतात, असे सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चार पर्यायी नकाशे तयार करण्यात आले होते. त्यापैकी स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी राजाराम पूल चौकात ४९५ मीटर लांबीचा आणि सिंहगडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृहापर्यंत २ हजार १२० मीटर लांबीचा उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. दुहेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी १६.३ मीटर आणि एकेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी ८.१५० मीटर एवढी आहे. भविष्यकाळात मेट्रो मार्गिकेचा विचार करून आवश्यक ती जागा ठेवण्यात येणार आहे. प्रस्तावित उड्डाण पुलामुळे २.७४ किलमीटर अंतराची वाहतूक थेट होईल, असा दावा करण्यात आला आहे.

उड्डाण पुलाची रचना

  • विठ्ठलवाडी ते फनटाइन चित्रपटगृह (वडगांव धायरीकडे जाण्यासाठी)
  • इंडियन ह्यूम पाइप ते भारत पेट्रोलियम-िहगणे (स्वारगेटकडे येण्यासाठी)
  • विठ्ठलवाडी ते बाजी पासलकर उड्डाण पूल (स्वारगेटकडे येण्यासाठी)