पुणे : पालखी आगमनानिमित्त शहरातील प्रमुख रस्ते बुधवारी दुपारनंतर बंद केल्याने शहरभर वाहतूक कोंडी झाली. प्रमुख रस्ते तसेच लगतचे छोटे रस्ते पोलिसांनी दुपारनंतर बांबुचे कठडे टाकून बंद केले. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आणि वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध न झाल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागले.

पालखी आगमनानिमित्त शहरातील प्रमुख रस्ते बुधवारी दुपारनंतर वाहतुकीस बंद राहणार असल्याचे पोलिसांकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी सकाळपासून पोलिसांनी लोखंडी तसेच बांबुचे कठडे टाकून जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता तसेच लगतचे रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध न झाल्याने कोंडीत भर पडली. सायंकाळनंतर लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता नाना, भवानी पेठेतील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले.

डेक्कन जिमखाना, आपटे रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्त्याला जोडणारे उपरस्ते बंद केल्याने वाहनचालकांना मनस्ताप सोसावा लागला. रात्री पालखी मुक्कामी आल्यानंतर वाहतुकीस रस्ते खुले करण्यात आले.

कोंडीमागची कारणे

पालखी आगमनानिमित्त दरवर्षी शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येतात. मात्र, प्रमुख रस्त्यांना जोडणारे उपरस्ते वाहतुकीस खुले ठेवण्यात येतात. प्रमुख चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. यंदाच्या वर्षी प्रमुख रस्त्यांलगतचे उपरस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात आले तसेच कठडे उभे करण्यात आल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे शहरभर वाहतूक कोंडी झाली.