तकलादू कडी, कुलपे चोरटय़ांच्या पथ्यावर

लाखो रुपयांची गृहसजावट; मात्र,कडी-कुलपांकडे दुर्लक्ष

प्रतिनिधिक छायाचित्र

लाखो रुपयांची गृहसजावट; मात्र,कडी-कुलपांकडे दुर्लक्ष

पुणे : शहरात दिवसाढवळ्या सोसायटय़ांमध्ये शिरून सदनिकांतील ऐवज लांबवून चोरटे पसार होतात. सोसायटीतील बंद सदनिकांची आधीच पाहणी केली जाते आणि अशा सदनिका फोडण्याचे प्रकार वाढले आहेत. सदनिकांचे तकलादू कडी-कोयंडे आणि कुलपे चोरटय़ांच्या पथ्यावर पडत आहेत. सदनिकांच्या दरवाजाची कडी-कोयंडे तसेच कुलूप कटावणीच्या साहाय्याने चोरटे काही सेकंदात उचकटून लाखो रुपयांचा ऐवज लांबवित असल्याचे निदर्शनास आले असून सदनिकाधारक कडी-कोयंडे आणि कुलपांच्या दर्जाबाबत फारसा विचार करत नसल्याने चोरटय़ांचे फावते, असे निरीक्षण गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांकडून नोंदविण्यात आले आहे.

शहरात घरफोडय़ा करणाऱ्या चोरटय़ांनी उच्छाद मांडला आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर अनेक जण पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. सोसायटीमधील बंद सदनिकांची पाहणी करून चोरटे कटावणीच्या साहाय्याने कुलूप आणि कडी-कोयंडे उचकटतात. कडी, कोयंडे आणि कुलूप उचकटण्यासाठी चोरटय़ांना फारसे श्रम घ्यावे लागत नाहीत. कारण अनेक सदनिकांच्या दरवाजाला लावलेले कुलूप निकृष्ट दर्जाचे असते. कटावणीच्या आघाताने कुलूप लगेच तुटते. चोरटे बंद सदनिकांची पाहणी करताना सर्वात पहिल्यांदा कडी-कोयंडे, कुलपांची पाहणी करतात. ज्या सदनिकाच्या दरवाजाला चांगल्या दर्जाची कडी, कोयंडे आणि कुलपे असतात, अशा सदनिकांच्या दरवाजाची कुलपे, कडी-कोयंडे उचकटण्याचा भानगडीत चोरटे पडत नाहीत. कारण चोरटय़ांना हे काम झटपट पार पाडायचे असते, असे निदर्शनास आले आहे.

जास्त श्रम न करता सहज उचकटता येणारी कडी-कोयंडे, कुलपे असणाऱ्या सदनिकांना चोरटे लक्ष्य करतात. शहरातील अनेक मोठय़ा सोसायटय़ांमधील सदनिकांचे मालक सजावटीसाठी लाखो रुपये खर्च करतात. मात्र, कडी, कोयंडे आणि कुलपे चांगल्या दर्जाची आहेत की नाही, याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे चोरटय़ांचे फावते, असे असे निरीक्षण गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदविले.

बांधकाम व्यावसायिकांकडून सदनिकांच्या दरवाजांना बसविण्यात आलेली कडी, कोयंडे आकर्षक पद्धतीने सजवलेले असतात. मात्र, कडी-कोयंडय़ासाठी भक्कम धातूचा (स्टील) वापर केलेला नसतो. कटावणीच्या एका फटक्यात कडी-कोयंडे सहजपणे उचकटले जातात. कटावणीचा फटका मारताना किंवा कुलप उचकटताना आवाज देखील होत नाही. सहजतेने कडी-कोयंडे, कुलूप उचकटून लाखो रुपयांचा ऐवज चोरट लांबवितात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तडजोड नकोच

बांधकाम व्यावसायिकांकडून नवीन सदनिकांना बसविण्यात आलेले कडी-कोयंडे आकर्षक दिसतात. पण त्यासाठी वापरण्यात आलेला धातू तेवढा मजबूत नसतो. त्यामुळे सदनिकाधारकांनी पहिल्यांदा दरवाजाला चांगल्या धातूपासून तयार करण्यात आलेली कडी-कोयंडे बसवावेत. कुलूपही चांगल्या कंपनीचे असावे. कुलूप निर्मिती करणाऱ्या काही चांगल्या कंपन्या आहेत. चांगल्या दर्जाच्या धातूपासून तयार करण्यात आलेले  कडी-कोयंडे, कुलपाची किंमत फार नसते. जास्तीत जास्त दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो. हार्डवेअर माल विक्रेत्यांकडे चौकशी केल्यास अशा प्रकारची कुलपे, कडी-कोयंडे मिळतात. मध्य भागात रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात हार्डवेअर माल विक्रेत्यांची दुकाने आहेत. गृहसजावटीसाठी लाखो रुपये खर्च करणारे नागरिक कडी-कोयंडा आणि कुलपाकडे दुर्लक्ष करतात, असे गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीसीटीव्ही नाहीत

शहरातील अनेक सोसायटय़ांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सुरक्षारक्षक नाहीत. ज्या सोसायटय़ांमध्ये सुरक्षारक्षक नाहीत अशा सोसायटय़ांमध्ये शिरून चोरटे बंद सदनिकांची पाहणी करतात. त्यामुळे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना करणे गरजेचे आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Robbery incident in closed flat increasing in pune zws

ताज्या बातम्या