पुणे : भारतामध्ये दरवर्षी ४० हजारांहून अधिक प्रोस्टेट कर्करोगाचे रुग्ण आढळतात. मात्र, शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन उपचारांशी निगडित धोक्यामुळे अनेक रुग्ण उपचार पुढे ढकलतात. यावर उपाय म्हणून जगातील प्रगत देशांमध्ये रोबोटिक हाय-इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाऊंड (हायफू) थेरपी वापरली जाते. आता प्रोस्टेट कर्करोगासाठीची ही अत्याधुनिक आणि विनाशस्त्रक्रिया उपचार पद्धती देशात प्रथम पुण्यात सुरू झाली आहे.

रुबी हॉल क्लिनिकमध्ये नव्याने सुरू झालेल्या कल्याणी इन्स्टिट्यूट ऑफ रोबोटिक हायफू थेरपी या केंद्रात ही उपचार पद्धती उपलब्ध आहे. या सुविधेचे उद्घाटन रूबी हॉल क्लिनिकचे डॉ. पी. के. ग्रँट, डॉ. सायमन ग्रँट आणि डॉ. हिमेश गांधी तसेच कल्याणी कुटुंबाचे प्रतिनिधी डॉ. बाबा कल्याणी, सुनीता कल्याणी आणि भारत फोर्जचे अमित कल्याणी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी फोकल वन संस्थेच्या अधिकारीही हजर होते.

कर्करोगावरील शस्त्रक्रिया आणि रेडिएशन उपचारांमध्ये जोखीम अधिक असते. या उपचारांनंतर बरे होण्याचा कालावधीही अधिक असतो. याचबरोबर त्यामुळे शारीरिक कार्यक्षमवर दीर्घकालीन परिणाम होण्याच्या भीतीमुळे अनेक रुग्ण उपचार पुढे ढकलतात. आता रोबोटिक हायफू पद्धतीमध्ये प्रोस्टेट कर्करोगावर अत्याधुनिक आणि विनाशस्त्रक्रिया उपचार शक्य झाले आहेत. याबाबत रूबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पी. के. ग्रँट म्हणाले की, रूबी हॉल क्लिनिकमध्ये भारतीय उपखंडातील पहिली रोबोटिक हायफू थेरपी सुरू झाली आहे. देशातील कर्करोग उपचारांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. अनेक वर्षे वाट पाहण्याऐवजी रुग्णांपर्यंत प्रगत आणि अर्थपूर्ण वैद्यकीय तंत्रज्ञान लवकर पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.

अनेक पुरुषांसाठी कर्करोगाएवढीच त्यावरील उपचारांची भीती असते. रोबोटिक हायफू उपचार पद्धतीमुळे ही भीती दूर होते. ही उपचार पद्धती विनाशस्त्रक्रिया असून रुग्णाला लवकर दैनंदिन आयुष्यात परतता येते. त्याला रुग्णालयात राहण्याची आवश्यकता नसते, अशी माहिती कर्करोगतज्ज्ञ डॉ. हिमेश गांधी यांनी दिली.

रोबोटिक हायफू थेरपीचे फायदे

  • अचूक लक्ष्यभेद : आजारी ऊती नष्ट करताना आजूबाजूच्या निरोगी ऊती सुरक्षित ठेवते.
  • विनाशस्त्रक्रिया प्रक्रिया: कोणतीही चिरफाड अथवा किरणोत्सर्ग नाही.
  • बरे होण्याचा कालावधी कमी : बहुतांश वेळा दिवसभरात उपचार घेऊन रुग्ण लगेच दैनंदिन कामे करू शकतो.
  • दुष्परिणाम कमी : पारंपरिक उपचारांच्या तुलनेत मूत्र व लैंगिक कार्यावर होणारा दुष्परिणाम कमी.