मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी ६ महिन्यांत ६.५ लाख मतदार वाढले आणि लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षाचा पराभव झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी केवळ एका महिन्यात ६.५ लाख मतदार वाढविण्यात आले, हे मतदार कुठून आले आणि कसे आले ? लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत तब्बल ७१ लाख मतदान अधिक कसे झाले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सरचिटणीस, आमदार रोहित पवार यांनी उपस्थितीत केला.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थितीत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पिपाणी या चिन्हावर आक्षेप घेतले होते. पण, ज्ञानेश कुमार यांनी आमच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष केले. आमचे अनेक उमेदवार पिपाणीमुळे पडले. शिरूर विधानसभा मतदारसंघात दुबार नावे होते, आम्ही त्यांचा शोध घेतला तर दुबार मतदारच दिसून आले नाहीत. आम्ही महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना भेटलो पण, ते फक्त गोड बोलतात. प्रत्यक्ष काम काहीही करत नाहीत, असा आरोपही पवार यांनी केला.

बिहार, पश्चिम बंगालमध्ये मतदार वगळून विजय

पश्चिम बंगालमध्येही मतदार वगळून भाजप जिंकली, महाराष्ट्रात २०२९ मध्ये केले जाणार आहे. बिहारमध्ये सुद्धा हीच पद्धत वापरली गेली. महाराष्ट्रात एकूण ९.७८ कोटी मतदार आहेत आणि आता २.६ कोटी नावे वगळण्यात आली आहेत. खडकवासला मतदारसंघात ५ लाख ७६ हजार ५०५ मतदार होते, एसआयआरमधून २ लाख ७७ हजार ८५१ वगळले. पण २०२४ ला ३ लाख २६ हजार ६६७ मतदान झाले होते. त्यामुळे येथे बाहेरून माणसे आणली गेली, त्यांच्याकडून मतदान करून घेतले गेले आणि आता त्यांची नावे वगळली जात आहेत, असेही पवार म्हणाले.

ज्ञानेश कुमार भाजपाच्या हातातील बाहुले

मुंबईत शिवसेना, मनसेचा ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा निघणार आहे, त्यात ईव्हीएम हटाओ, हा सुद्धा एक मुद्दा घ्यावा लागेल. ज्ञानेश कुमार भाजपच्या हातातील बाबुले आहेत, म्हणून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोपही पवार यांनी केला.