पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यु प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे देण्यात आला असला तरी, सीआयडीवर दबाव आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असून त्यांचा दबाव आहे का, हे माहिती नाही. मात्र या अपघात प्रकरणाची चौकशी होण्यासंदर्भात न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे,’ असे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सीआयडीकडून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तपास गेल्यास तपासावर नियंत्रण राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या बारामती येथील विमान अपघाताच्या घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडून सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. ‘मुंबई आणि बारामती येथे आमच्या तक्रारीनुसार एफआयआर घेतला गेला नाही.

अपघातासंदर्भात २४ जानेवारीच्या ‘डीजीसीए’ च्या अहवालात ‘व्हीएसआर’ विमान कंपनीला दोषी धरण्यात आले आहे. त्यामुळे ‘व्हीएसआर’ वर एफआयआर दाखल करावा अशी आमची मागणी आहे. त्याला सीआयडीनेही नकार दिला आहे. सीआयडीच्या ज्या अधिकाऱ्यांकडे तपास आहे. त्या अधिकाऱ्यांची प्रतिमा चांगली आहे. सीआयडीकडे मी निवेदन दिले आहे. मात्र सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यास तपासावर नियंत्रण राहणार नाही. तसेच सीआयडीवरही दबाव आहे,’ असे पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘व्हीएसआर कंपनी तेलगू देसम पक्षाला (टीडीपी) अर्थसहाय्य करत आहे. त्यामुळे या कंपनीला वाचविले जात आहे. भारतीय जनता पक्षाचे काही नेते व्हीएसआरशी संबंधित आहेत. त्यामुळे हे नेते माझ्याबाबत नकारात्मक बोलत आहेत.’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आम्हाला छुपा पाठिंबा आहे. शिंदे अजित पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. अजित पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही न्यायालयात जाणार आहोत. तोच एक पर्याय आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.