Rohit Pawar On Baramati 2029 Elections: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. भविष्यात बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबातील सदस्यांमधील थेट राजकीय सामना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुरुवारी (२३ एप्रिल) पिंपळी येथे कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावल्यानंतर काटेवाडी येथे माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘अजितदादांच्या प्रेमापोटी आम्ही सुनेत्राकाकींचा प्रचार केला. पण आता आमचे पक्ष वेगळे झाले आहेत. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही.’
जय पवार यांनी २०१९ मध्ये उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देत रोहित पवार म्हणाले, ‘कार्यकर्त्यांची आणि पक्षाची इच्छा महत्त्वाची असते. प्रत्येक पक्ष आपापल्या पातळीवर उमेदवारी ठरवेल. जर २०२९ मध्ये जय पवार उमेदवार असतील, तर आमच्या पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.’
सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली नाही तर दुसरा उमेदवार उभा राहील आणि बारामतीत सर्वपक्षीय लढत होण्याची शक्यता असल्याचेही रोहित पवार यांनी नमूद केले. “भावनिक दृष्टिकोनातून आम्ही या पोटनिवडणुकीत सुनेत्राकाकींसाठी काम केले, पण पुढील निवडणुकीत सर्वजण आपापल्या पक्षाच्या बाजूने उभे राहतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतही मोठे भाष्य केले. ते म्हणाले, “अजितदादा आज असते तर नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले असते. दादांनीच विलीनीकरणासाठी पुढाकार घेतला होता. २०२९ पर्यंत पक्षाची ताकद वाढवून ते मुख्यमंत्री झाले असते. पण आता ते नसल्याने विलीनीकरणाचा मुद्दा पुढे येत नाही.”
जय पवार यांनीही माध्यमांशी बोलताना कार्यकर्ता म्हणून काम करण्याची आपली इच्छा व्यक्त केली होती. मात्र, लोक आणि कार्यकर्त्यांची २०२९ साठी उमेदवारीची मागणी असल्याचे त्यांनी सूचित केले. सध्या बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांचे हे वक्तव्य पवार कुटुंबातील राजकीय भविष्य आणि बारामतीच्या राजकारणाला नवे वळण देणारे मानले जात आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत रंगण्याची शक्यता आता अधिक ठळक झाली आहे.
