बारामती : बारामती पोटनिवडणुकीत पक्षभेद बाजूला ठेवून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार आणि पुतण्या आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी कोपरा बैठका घेण्यास सुरुवात केली. ‘बारामतीत बाहेरून येऊन समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मतदार योग्य उत्तर देतील,’ अशी टिप्पणी आमदार रोहित पवार यांनी भाजपचा नामोल्लेख न करता केली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी कोपरा बैठक घेण्यात आली. त्यास राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार आणि त्यांची भगिनी सई पवार उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार पवार म्हणाले, ‘बारामतीत बाहेरून येऊन राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना येथील मतदार योग्य उत्तर देतील. बारामतीकरांना कोणी दिशा दाखवण्याची गरज नाही. अजित पवार यांनी बारामतीसाठी केलेले काम लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक भावनिक वातावरणात होत असून, मतदार स्वयंस्फूर्तीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहतील.’
‘मतदान जास्त झाले, तर त्याचा सर्वाधिक फायदा सुनेत्रा पवार यांनाच होईल. बारामतीतील जनतेने मनोमन निर्णय घेतलेला आहे,’ असेही ते म्हणाले. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करत रोहित पवार म्हणाले, ‘ब्लॅक बॉक्स’बाबत अद्यापही समाधानकारक माहिती समोर आलेली नाही. ‘एसआयटी’ने काही बाबी उघड केल्या. मात्र, तपास अधिक वेगाने व्हायला हवा.’ खरात प्रकरणाबाबत ते म्हणाले, ‘या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्या केवळ पारदर्शक तपासातूनच दूर होऊ शकतात. हे प्रकरण हलक्यात घेण्यासारखे नाही.’
‘कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी बजावली’
ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार का, याबाबत आमदार पवार म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली.’
‘मी कर्जत-जामखेडशी जोडलेला’
बारामतीत आमदार रोहित पवार यांनी प्रचार सुरू केल्याने उलटसुलट चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, ‘मला पहिल्यांदा जिल्हा परिषदेत अजित पवार यांनी बारामतीत संधी दिली. माझा राजकीय प्रवास कर्जत-जामखेडशी जोडलेला आहे. बारामतीत अजित पवार यांच्याबाबत असलेल्या भावनेतून येत आहे.’
