पुणे : ‘खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भविष्यात भाजपमधून निवडणूक लढवतील,’ असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे २२ आमदार आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या आमदारांसह ४० आमदारांवर भाजपाचा सापळा (ट्रॅप) असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील.’ असा दावाही आमदार रोहित पवार यांनी केला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारी पदावरून तटकरे आणि पटेल यांना डावलण्यात आले आहे. या पार्श्वभूमीर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले,‘सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार आहेत. त्यांच्यासोबत २२ आमदारांचेही ठरले आहे.
तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही आमदारांसह ४० आमदारांवर भाजपने सापळा रचला आहे. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.’ ‘भाजप प्रवेशाची ही प्रक्रिया २०२९ पर्यंत होणार होती. मात्र, आता ती थोडी लवकर सुरू झाली आहे. तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर पुन्हा निवडणूक होईल. त्यांच्या मतदारसंघात निवडणूक झाली, तर ते निवडून येणार नाहीत. शिवसेना (शिंदे) पक्ष त्यांचा पराभव करेल.’ अशी टीकाही आमदार रोहित पवार यांनी केली.
‘सुनेत्रा पवार यांचा धाडसी निर्णय’
उपुमख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख नेत्यांना पद दिलेले नाही. याबाबत आमदार रोहित पवार म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी धाडसी निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर त्यांनी समाजमाध्यमावरून प्रशासकीय चूक दुरुस्त केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. असे सातत्याने होत असल्याने त्यांनी मजकूर टाइप करणारी व्यक्ती बदलावी. हा त्यांच्या पक्षाचा विषय असला, तरी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय बदलला नसता. असा बदल केल्यास वेगळा संदेश जातो. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासारखेच आहे.
‘तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा’
खासदार तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याबाबत आमदार रोहित पवार म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख नेत्यांना पक्षात जागा दिलेली नाही. तटकरे यांना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेलेल्यांचे स्वागतच आहे. त्यांना कोणीही भेटू शकते. मात्र, तटकरे यांना त्यांच्याच पक्षाला संदेश द्यायचा असू शकते.’
