पुणे : ‘एमपीएससी’च्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी लोकमान्य टिळक चौकात ठिय्या आंदाेलन करण्याबाबत परवानगी मागितली होती. ‘संबंधित चौक हा शहरातील महत्त्वाचा चौक आहे. कायदा आणि सुव्यवस्था विचारात घेऊन या आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली आहे,’ असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
या आंदोलनाला परवानगी मिळावी, यासाठी रोहित पवार हे विद्यार्थ्यांसह पोलीस आयुक्तालयात मंगळवारी आले होते. सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. ‘सुरुवातीला आंदोलनासाठी २६ सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. मात्र, विसर्जन मिरवणूक आणि पोलिसांवरील अतिरिक्त ताणामुळे आंदोलन २७ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे,’ असे पवार यांनी जाहीर केले.
‘लोकमान्य टिळक चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. हा भाग संवेदनशील आहे. शांतता, तसेच कायदा आणि सुव्यवस्था विचारात घेऊन प्राप्त अधिकारानुसार रोहित पवार यांचे ठिय्या आंदोलन, विद्यार्थ्यांच्या उपोषणास परवानगी नाकारण्यात आली आहे,’ असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले. या आंदोलनासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आंदोलन करण्याचे पर्याय देण्यात आले आहेत.
