पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्य प्रकरणाला चार महिने झाले आहेत. विमान अपघात प्रकरण संवेदनशील आहे. चार महिन्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) अपघात प्रकरणात ठोस माहिती, तसेच तपासातील प्रगती अहवाल सादर करण्यात आला नाही. तपास होणार नसेल तर ‘सीआयडी’ कार्यालयाला टाळे लावा, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी केली.
दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती परिसरात विमान अपघात झाला. अपघात प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींवर कठोर कारवाईची मागणी रोहित पवार यांनी केली होती. विमान अपघात प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडून करण्यात येत आहे. सीआयडीकडून तपास संथगतीने होत आहे. अद्याप ठोस कारवाई तसेच तपासातील प्रगती अहवाल सादर करण्यात आला नाही, अशी टीका रोहित पवार यांनी शुक्रवारी (२९ मे) केली. ‘सीआयडी’ कार्यालयाला पवार यांनी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. पवार हे कुलूप घेऊन ‘सीआयडी’ कार्यालयात आले होते.
‘राज्यातील महत्त्वाच्या नेत्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. अद्याप सत्य बाहेर आले नाही. या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे. तो कोठपर्यंत पोहोचला आहे, याची सविस्तर माहिती जनतेला मिळायली हवी. तपास यंत्रण अकार्यक्षम आहे’, असा आरोप पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुलूप घेऊन प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले’, असे पवार यांनी नमूद केले.
तपास ‘सीबीआय’कडे देण्याची मागणी
‘पूर्वी सीआयडीकडून केल्या जणाऱ्या तपासाबद्दल शंका उपस्थित केली जात नव्हती. आता परिस्थिती बदलली आहे. सीआयडीकडून जबाबदारीने काम केले जात नाही. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात तपास काय झाला ? याची माहिती घेण्यासाठी गेले चार महिने प्रयत्न केले जात आहे. अजित पवार विमान अपघात प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात यावा’, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
तपास योग्य दिशेने सुरू
‘ विमान अपघात प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. सीआयडीकडून विविध विभाग, तसेच संस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. विविध यंत्रणाकडून तपासाच्या अनुषंगाने लागणारी माहिती, तसेच अहवाल मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे’, अशी माहिीत सीआयडीतील अधिकाऱ्यांनी दिली.
