मुंबई : वाढती महागाई, इंधनाचे वाढलेले दर, वाढलेली मजुरी आणि मजुरांच्या तुटवड्यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च प्रती किलो अठरा ते वीस रुपयांवर गेला आहे. त्यामुळे कांद्याला प्रति किलो २५ रुपये दर मिळणे, हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे.

वाढलेले इंधनाचे दर. वाढलेली मजुरी. वाढलेला वाहतूक खर्च आदींमुळे कांद्याचा उत्पादन खर्च कांद्याचा १८ ते २० रुपये प्रति किलोंवर गेला आहे. त्यामुळे कांद्याला किमान २५ रुपये किलो दर मिळणे हा, शेतकऱ्यांचा हक्क आहे. तसेच यापूर्वी कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती किलो १५ रुपये किलो अनुदान मिळाले पाहिजे. शासकीय खरेदीची मर्यादा किमान १० लाख टनांपर्यंत वाढली पाहिजे. शासनाने खरेदी केलेल्या कांद्याची जगभरात निर्यात झाली पाहिजे, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हलक्यात न घेता त्वरित मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा हा लढा अधिक तीव्र केला जाईल. दोन जून रोजी पुण्यानजीक पुणे – नाशिक महामार्गावर आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रस्ता रोको करणार आहोत, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.