पुणे ः आमदार रोहित पवार जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. मात्र, सुरूवातीला या आंदोलनावर रोहित पवार का बोलत नव्हते, हा प्रश्न अनेकांना पडला होता. आता पवार यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जल्लोषात सहभागी झाल्यानंतर रोहित पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
‘एकिकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धर्मेंद्र प्रधान यांची बाजू घेऊन बोलतात. पण, राज्यातच पेपरफुटीचे प्रकार घडत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे अंधभक्तांचे शिरोमणी आहेत,’ अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी रविवारी केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ‘औषध निरीक्षक’ (ड्रग इन्स्ट्पेक्टर ) परीक्षेचा पेपर २२ मार्चला होता. पण, २० मार्चलाच हा पेपर फुटला. व्हॉट्सॲपवर प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार एका उमेदवाराने केली आहे. याबाबत लवकरच सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित विद्यार्थ्यांच्या जल्लोष कार्यक्रमात पवार बोलत होते. ते म्हणाले, युवा शक्ती जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन एकत्र आली. त्यामुळेच हा विजय झाला. विद्यार्थ्यांच्या एकजुटीतून शिकावे लागेल. या एकजुटीमुळेच एका केंद्रीय मंत्र्याला पायउतार व्हावे लागले. अहंकारी सरकारला नरमाईची भूमिका घ्यावी लागली. आता या पुढे कुठेही अन्याय झाला, तर हीच युवा शक्ती उभी राहील, असा विश्वास वाटतो.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेले आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नव्हते. ते विद्यार्थांच्या समस्या आणि पेपरफुटी विरोधात होते. मी सुरुवातीला बोललो नाही, कारण या आंदोलनाला राजकीय स्वरुप प्राप्त झाले असते. आता विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात अनेक युवकांवर गुन्हे दाखल झाले. येत्या दहा दिवसांत हे गुन्हे मागे घेतले नाहीत, तर आम्ही शांत बसणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आंदोलन यशस्वी झाल्याचा आनंद विद्यापीठात एकत्र येऊन विद्यार्थ्यांनी साजरा केला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘छात्र एकता जिंदाबाद’, ‘जब जब सरकार डरती है, हिंदू मुस्लिम करती है’, ‘युवा शक्ती जिंदाबाद’ अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. नीटचा पेपर फुटल्याने आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुण्यातून दिल्ल्लीत जंतर-मंतरवर आंदोलनाला गेलेल्या विद्यार्थ्यांनी आपला अनुभव सांगितला.
रोहित पवार यांच्यासमोर विद्यार्थ्यांच्या तक्रारीचा पाढा
विद्यापीठाच्या हेल्थ सेंटरमध्ये सर्व आजारांसाठी एकच गोळी दिली जाते. सायंकाळनंतर पैसे आकारले जातात. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत वाढीव मानधन मिळालेले नाही. बार्टी, सारथी, महाज्योती यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या अधिवृत्तीमध्ये समानता नाही, अशा अनेक तक्रारींचा पाढा विद्यार्थ्यांनी आमदार रोहित पवार यांच्यासमोर वाचला.
