पिंपरी-चिंचवडमधील मोशी या ठिकाणी असलेल्या एका कचरा डेपोत बुधवारी (८ जुलै) एक मोठी दुर्घटना घडली. एका इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. त्यानंतर त्यावर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली १५ ते १६ मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, एनडीआरएफचे जवान, आर्मीच्या जवानांचं पथक, स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, या घटनेवर आता विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत सरकारवर संताप व्यक्त केला आहे. या घटनेला सर्वस्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. तसेच ‘कामगारांच्या जीवाला सरकार कचरा समजत आहे का?’, असा सवालही रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
“पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोशी या ठिकाणी घातलेला कचऱ्याचा डोंगर महापालिकेच्याच कचरा प्रकल्पासाठी वापरात असलेल्या इमारतीवर कोसळल्याने इमारतीखाली तब्बल ९ पेक्षा अधिक कामगार अडकले आहेत. आज दुपारी १ वाजता ही घटना घडली, तरी अद्याप त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. ही घटना अत्यंत भीषण असून प्रथमदर्शनी याला सर्वस्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका जबाबदार असल्याचं दिसतं. हे सरकार कामगारांच्या जीवाला काय कचरा समजत आहे का? सध्या वेगाने बचाव कार्य राबवून अडकलेल्या कामगारांना तातडीने सुखरुप बाहेर काढण्यात यावं आणि या घटनेची सखोल चौकशी करुन याला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी”, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
दरम्यान, मोशीमधील कचरा डेपोत बुधवारी घडलेल्या या दुर्घटनेनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील घटनेचा आढावा घेतला आहे. तसेच प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
