पिंपरी : पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ज्या पद्धतीने पुणे जिल्ह्याकडे लक्ष असणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे लक्ष नाही. राज्यातील मंत्री जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करित आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील अनेक कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला.

आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी चाकण एमआयडीसी परिसराची पाहणी केली. कंपन्यांना भेट दिली. तेथील उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या. वाहतूक कोंडी, कचरा, रस्त्यांची मोठी समस्या येथे आहे. अंतर्गत, महामार्गावरील रस्ते खराब आहेत. सुविधा नाहीत. त्यामुळे २० कंपन्यांनी चाकण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट मीटरमुळे उद्योजकांची २० टक्क्यांनी देयके वाढून आली आहेत. रस्ते, येथील समस्या सोडवविण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत. या परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होत आहेत. त्याला सरकार जबाबदार आहे. सरकारने कंपन्या व्यवस्थापनाशी चर्चा करावी. उद्योगांना वीज साडेबारा रुपये दराने दिली जाते. हेच दुसऱ्या राज्यात पाच रुपये दराने वीज मिळते. सोलर योजना बदलली आहे, असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले.

भाजपचे बोलघेवडे आमदार उद्योगाबाबत अज्ञानी

महाराष्ट्रातील कंपन्या सोडून जात आहेत. यात खोटे कथानक काही नाही. शासनाने कंपन्यांना गृहित धरले आहे. उद्योगांच्या बाजुने बोललो, तर सत्ताधारी आमच्यावर टीका करतात. भाजपच्या बोलणाऱ्या, टीका करणाऱ्या आमदारांना उद्योग, विकास काय असतो, हे माहिती नाही. जीभ बाहेर काढायची आणि आदेश आल्याप्रमाणे बोलायचे एवढेच त्यांना माहिती असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले.

खासदार कुठे आहेत?

चाकणमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून अपघात वाढले आहेत. असे असताना या भागाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे अद्यापही फिरकले नाहीत. याबाबत विचारले असता आमदार रोहित पवार म्हणाले, लोकसभेचे अधिवेशन सुरु होते. अधिवेशन गुरुवारी संपले आहे. पुढील काही दिवसात डॉ. अमोल कोल्हे येथे येतील. लोकसभेत मतदारसंघातील विषय मांडावे लागतात. मतदारसंघातील प्रश्नांबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आहे. याबाबतची माहिती डॉ. अमोल कोल्हे स्पष्टपणे सांगू शकतील.