पिंपरी : ‘उद्योगमंत्री उदय सामंत केवळ राजकीय उद्योग करित फिरत आहेत. ते काय आणि कसे करतात, हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी राजकीय उद्योग बंद करुन उद्योगांच्या समस्या सोडविण्याकडे लक्ष द्यावे. एका व्यासपीठावर येऊन कोणत्या, किती कंपन्या बाहेर गेल्या आहेत, यावर चर्चा करण्याची हिंमत दाखवावी. एमआयडीसीच्या नवीन टप्प्यामध्ये जमिन विकत घ्यावी लागत असल्याने उद्योगमंत्र्यांना केवळ तिथे रस असतो. अडचणी सोडविण्यात कुठेही रस नाही’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी चाकण एमआयडीसी परिसराची पाहणी केली. कंपन्यांना भेट दिली. तेथील उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या. ‘कोणत्या, किती कंपन्या बाहेर गेल्या आहेत. त्यामुळे उद्योगाची, राज्याची आर्थिक परिस्थिती काय झाली आहे, हे पुराव्यास सांगायला तयार आहोत. त्यासाठी उद्योगमंत्र्यांनी एका व्यासपीठावर यावे. वाहतूक कोंडी नसलेल्या सुटीच्या दिवशी रविवारी ते येथे येणार आहेत. त्यांनी पोलिसांना न सांगता एकट्याने मोटारीतून यावे. वाहतूक कोंडीचा अनुभव घ्यावा’.
आमदार रोहित पवार म्हणाले, ‘सन २०१४ नंतर चाकण परिसरात एकही नवीन कंपनी आली नाही. दहा बाय दहाच्या खोलीत कार्यालय असणारी कंपनी दावोसमध्ये करार करते. २० हजार लोकांना नोकरी देतो असे सांगितले जाते. किती कंपन्यांनी करार केले. त्यांपैकी किती उद्योग सुरु झाले. याचे आकडे सरकारने सांगावे. उद्योगांमधून मिळणारा कर येथील सुविधांसाठीच वापरला पाहिजे. स्मार्ट मीटरमुळे उद्योजकांची २० टक्क्यांनी देयके वाढून आली आहेत. चाकण परिसरात एमआयडीसीचे रुग्णालय उभारावे’, असेही ते म्हणाले.
चाकण एमआयडीसी परिसरात बारा ते १५ लाख लोक काम करतात. पिंपरी-चिंचवड, तळेगाव दाभाडे या परिसरात २५ ते ३० लाख लोक काम करतात. कामगारांचा प्रवासात वेळ जातो. त्यामुळे खोल्यांमध्ये कामगार वर्ग राहतो. कामगारांच्या सुरिक्षततेकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही आमदार रोहित पवार म्हणाले.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे महसूलमंत्री असताना तलाठी भरतीचा पेपर फुटला होता. त्यात भ्रष्टाचार झाला होता. मॅटनेही त्यात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अगोदर राजीनामा द्यावा. त्यानंतर शरद पवार यांच्यावर बोलावे, असेही आमदार रोहित पवार म्हणाले.
