पुणे : प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहूतील निवासस्थानासमोर गोळीबार करुन पसार झालेल्या पाच जणांना वारजे पोलिसांनी अटक केली. मुंबई गुन्हे शाखेचे पथक पसार आरोपींचा शोध घेत होते. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वारजे पोलिसांच्या पथकाने वारजे, कर्वेनगर, धायरी, नऱ्हे भागात कारवाई करुन पाच जणांना ताब्यात घेतले.

सिद्धार्थ दीपक येनपुरे, समर्थ शिवशंकर पोमाजी, स्वप्नील बंडू सकट, आदित्य ज्ञानेश्वर गायके, अमन आनंद मराठे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुंबईतील जुहू परिसरात दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानासमोर पिस्तूलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी (३१ जानेवारी) रात्री घडली होती.

सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नव्हते. शेट्टी यांच्या निवासस्थानासमोर गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. गुंड लाॅरेन्स बिष्णेाई याचा निकटवर्तीय आरजू बिष्णोई याने साथीदारांशी संगनमत करुन गोळीबार केला. समाज माध्यमात बिष्णोई याने ध्वनीफीत प्रसारित केली.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी जुहू परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. हल्लेखोर दुचाकीवरुन पसार झाले होते. तांत्रिक तपासात पसार झालेले आरोपी पुण्यातील वारजे परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने याबाबतची माहिती पुणे पोलिसंना कळविली.

वारजे पोलिसांच्या पथकाने पाच संशयितांना वारजे, कर्वेनगर, नऱ्हे, धायरी भागातून ताब्यात घेतले. त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

प्राथमिक चौकशीत आरोपी लाॅरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी यांची १२ ऑकटोबर २०२४ रोजी वांद्रे परिसरात हत्या करण्यात आली होती. बिष्णोई टोळीने त्यांची हत्या केल्याची माहिती तपासात मिळाली होती. या प्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली होती.

वारजे परिसरातील गुंड शुभम लोणकर सिद्धीकी हत्या प्रकरणात सामील असल्याचे उघडकीस आले होते. त्याने सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांना आश्रय दिलाची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली. या घटनेनंतर लोणकर पसार झाला असून, अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा भाऊ प्रवीण याला पोलिसांनी अटक केली होती.

बिष्णोई टोळी पुण्यात सक्रीय ?

लोणकर आणि त्याच्या साथीदारांचे बिष्णोई टोळीशी निकटचे संबंध असल्याचे उघडकीस आल्यावर पुणे आणि मुंबई पोलिसांनी त्याचा ठिकठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला. पुणे पोलिसांच्या पथकाने पंजाब, हरयाणा परिसरातही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप तो हाती लागलेला नाही.

सिद्दीकी यांच्या हत्येनंतर रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानासमोर गोळीबार करणारे आरोपी पुण्यातील असल्याचे निष्पन्न झाले. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्ये प्रकरणातही पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातील गुंड संतोष जाधव, सिद्धेश कांबळे उर्फ महाकाल आणि तेजस कैलास शिंदे यांना पंजाब पोलिसांनी अटक केली होती. पिंपरीतील एका व्यावसायिकाला बिष्णोई टोळने खंडणीसाठी धमकाविल्याची घटना नुकतीच घडली होती. वर्षभरापूर्वी बिष्णोई टोळीने एका बांधकाम व्यावसियाकाल खंडणीसाठी धमकाविले होते.