पुणे : लोकमान्य टिळक यांचे खापरपणतू रोहित टिळक हे काँग्रेसचा ‘हात’ सोडून शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ हाती घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ देण्यात आल्याने; तसेच शिवसेनेकडून (शिंदे) राज्यसभेच्या उमेदवारीसाठी विचारणा करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने अंतर ठेवण्यास सुरुवात केल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे रोहित टिळक यांनी स्पष्ट केले.
रोहित टिळक यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना काँग्रेस सोडण्यामागील भूमिका स्पष्ट केली. ‘लोकमान्य टिळक यांच्या नावाने पुरस्कार देताना आम्ही कधीच पक्षीय अभिनिवेश ठेवला नाही; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ देण्यात आल्यापासून काँग्रेस नेतृत्वाने आमच्याशी अंतर ठेवण्यास सुरवात केली. टिळक परिवाराने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि प्रणव मुखर्जी यांनाही हा पुरस्कार दिला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट हा राजकीय पक्ष बघून कधीच पुरस्कार देत नाही, तर संबंधित सत्कारमूर्तीचे कर्तृत्व पाहूनच पुरस्कार दिला जातो. तरीही पंतप्रधान मोदी यांना पुरस्कार देण्यात आल्यावर आक्षेप का घेण्यात आला?’ असा सवाल रोहित टिळक यांनी मुलाखतीमध्ये केला. ‘आम्ही थेट काँग्रेस हायकमांडपर्यंत बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; पण उपयोग झाला नाही. म्हणूनच काँग्रेसचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.’ असे रोहित टिळक यांनी स्पष्ट केले.
राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे) पक्षाकडून रोहित टिळक यांना उमेदवारी दिली जाणार होती. मात्र, आयत्यावेळी महाविकास आघाडीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना संधी दिल्याने त्यांचे नाव मागे पडले. ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदारी देतील ती जबाबदारी आनंदाने स्वीकारेल. काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहे.’ असेही रोहित टिळक यांनी मुलाखतीत सांगितले.दरम्यान, या बाबत रोहित टिळक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
काँग्रेस आणि टिळक घराणे
टिळक घराणे हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले आहे. लोकमान्य टिळक यांचे नातू दिवंगत जयंतराव टिळक हे काँग्रेसचे खासदार आणि विधान परिषदेचे सभापती होते. रोहित टिळक यांनी ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. २००९ आणि २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी कसबा विधानसभेची निवडणूक लढली. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले आहे.
