scorecardresearch

पुणे : ३० हजारांच्या कर्जावर मागितले एक लाख रुपये व्याज; बेकायदा सावकारी करणारा जेरबंद

न्यायालयाने २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

CRIME AND ARREST
(प्रातिनिधिक छायाचित्र)

भावावर औषधोपचार करण्यासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या कर्जावर तब्बल एक लाख रुपयांचे व्याज मागत कुटुंबातील व्यक्तीला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्याला २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सतीश बन्सिलाल भाटी (वय ५४ रा. भवानी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. फिर्यादी तरुणाने भावाच्या औषधोपचारासाठी भाटी याच्याकडून दरमहा १५ टक्के व्याजदराने ३० हजारांची रक्कम घेतली होती. कर्ज घेताना दुचाकीची कागदपत्रे आणि दोन धनादेश भाटीला दिले होते. आरोपीने साथीदारासह तरुणाच्या घरात शिरून २२ महिन्यांचे व्याज आणि मूळ अशा एक लाख २९ हजारांची मागणी केली. एवढच नाही तर रक्कम न दिल्यास कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत मारहाण देखील केली.

तसेच, भाटीने तरुणाने दिलेल्या धनादेशाद्वारे १९ हजार रुपये काढूनही घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या युनिट एक शाखेने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या दुकानासह घरामध्ये ६४ धनादेश, बँकेचे १६ पासबुक, मोबाइल असा १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला पुढील तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, अजय जाधव, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, अभिनव लडकत, रुखक्साना नदाफ यांनी ही करावाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rs 1 lakh interest demanded on loan of rs 30000 illegal lender arrested msr