पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज होण्याच्या दृष्टीने संघ शताब्दीनिमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतील तीन हजारांहून अधिक सकल हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात १२ लाख नागरिक सहभागी होणार आहेत. ‘गृहसंवाद’ मोहिमेत १० लाख ८५ हजार कुटुंबांपर्यंत संघ स्वयंसेवक पोहोचले असून, ‘पंच परिवर्तना’च्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष प्रा. सुरेश ऊर्फ नाना जाधव यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी ही माहिती दिली. प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सज्जनशक्तीला संघाशी जोडून घेण्यावर भर देण्यात आला आहे. या अंतर्गत संघाच्या रचनेनुसार पुणे महानगरातील ५५ नगरांमधील सुमारे साडेतीन लाख घरांपर्यंत पोहोचून स्वयंसेवकांनी पुणेकरांशी संवाद साधला. तर, पुणे महानगरात एप्रिलअखेरपर्यंत ४५० सकल हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे,’ असे जाधव यांनी सांगितले.
‘गेल्या वर्षभरात देशपातळीवर संघाच्या शाखांमध्ये सहा हजारांनी वाढ झाली. अंदमान, अरुणाचल प्रदेश, लेह आणि दुर्गम भागांतही संघाच्या शाखा कार्यरत आहेत. देशभरात गतवर्षी ५१ हजार ७४० ठिकाणी संघाच्या ८३ हजार १२९ शाखा भरत होत्या. आता त्यात वाढ होऊन ५५ हजार ६८३ ठिकाणी ८८ हजार ९४९ शाखा भरत आहेत. एका वर्षात तीन हजार ९४३ नव्या ठिकाणी पाच हजार ८२० शाखा वाढल्या. पश्चिम महाराष्ट्र प्रांतात १९८ ठिकाणी ७७६ शाखा, ७०५ साप्ताहिक मिलने आणि २८४ संघमंडळी असा विस्तार झाला,’ असे डॉ. दबडघाव यांनी सांगितले.
‘संघ शताब्दीनिमित्ताने झालेल्या गृहसंपर्क अभियानात संघाचे स्वयंसेवक पश्चिम महाराष्ट्र प्रांतात दहा लाख ८५ हजार घरांपर्यंत पोहोचले असून, प्रांतात तीन हजारांहून अधिक सकल हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात १२ लाख नागरिक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. पुणे महानगरात ४५० सकल हिंदू संमेलने होतील,’ असे डॉ. दबडघाव यांनी स्पष्ट केले.
