राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कोणतंही काम लहान मोठं नसतं, असं मत व्यक्त केलं. तसेच यातील जर एक काम झालं नाही, तर समाजाच्या गाड्याला खिळ बसेल, असंही त्यांनी नमूद केलं. पुण्यात डॉ. दादा गुजर माता बाल रुग्णालयाचे उद्घाटन मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

मोहन भागवत म्हणाले, “चिकित्सा ही सेवा असून समाजामध्ये आपण जे काम करतो त्याला आज आपण पोट भरण्याचे साधन म्हणतो. वास्तविक कुठलेही काम पोट भरण्याचे काम नसते. ते समाजाची आवश्यकता पूर्ण करणारं काम आहे. त्याला आज आपण उपजीविका म्हणतो. त्यालापूर्वी आपण वृत्ती म्हणायचो. आपल्याजवळ जी क्षमता, जी कला आहे त्याआधारे समाज चालावा म्हणून आपण काम करतो. ते काम लहान नसतं.”

“काम कोणतेही असो, लहानातील लहान आणि मोठ्यातील मोठं काम. देश चालविणारे शासन प्रमुख असो किंवा लोकांचे मनोरंजन करणारे गायक असोत किंवा रस्त्यांची सफाई करणारे कर्मचारी असो, ते जे करतात ते समाज चालावा यासाठी करतात. त्यामुळे त्यांच्या कामाची किंमत समान आहे. हे आवश्यकच आहे. यातील एक काम जर झालं नाही, तर समाजाच्या गाड्याला खीळ बसेल. कारण ते जे काम करतात, ते समाजाच काम करायचं म्हणून करतात. त्यातून त्यांचं पोट भरायची व्यवस्था होते,” असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केली.

मोहन भागवत पुढे म्हणाले, “हे बाय प्रॉडक्ट असून अशा भावनेतून जेव्हा लोक काम करतात तेव्हा समाजाप्रती एक भाव दिसून येतो. त्यामुळे या सर्वांची प्रतिष्ठा समान आहे. शेतकरी जेव्हा शेती करतो तेव्हा तो स्वतःसाठी करत नाही. आज जुनी माणसं म्हणतात, शेती कशासाठी सोडायची तो आमचा धर्म आहे. हा कुठला नवीन धर्म काढला. धर्म नवीन नसून धर्म समाजाची धारणा करतो. या संवेदनेपोटी मनुष्य कर्तव्य म्हणून ते काम करत असतात.”

“हडपसर येथील कार्यक्रम दोन वर्षापुर्वी ठरला होता, पण करोना आडवा आला. त्यानंतर आजचा दिवस उजाडला, तर मला इथे कार्याचं आणि कार्यकर्त्यांचं दर्शन घडलं. कार्य पाहिले, तर कार्यकर्ता कसा असेल याचा अंदाज बांधत येतो. कार्यकर्ता भेटला की कार्य कसं सुरू असेल याचा अंदाज बांधता येतो. हा सगळीकडेच अनुभव येतो. साने गुरुजी यांची प्रेरणा आणि दादा गुजर यांनी केलेलं कार्य आहे. ही भावनेच्या भरात केलेली गोष्ट नसून त्याला धर्म शास्त्राचा देखील आधार आहे. करुणा हे धर्माचं मूळ तत्व आहे. ज्या चार मूळ तत्त्वावर धर्म चालतो त्यापैकी एक म्हणजे करुणा,” असंही मोहन भागवत यांनी नमूद केलं.

या कार्यक्रमाला उद्योगपती बाबा कल्याणी, सुनीता कल्याणी, महाराष्ट्र आरोग्य मंडळ संचलित सचिव अनिल गुजरही उपस्थित होते.