पुणे : ‘देशाच्या इतिहासात मराठ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. दिल्लीची बादशाही खिळखिळी झालेली असताना अहमदशाह अब्दालीने दिल्लीवर आक्रमण केले. त्या वेळी मराठ्यांनी शेकडो मैल दूर जाऊन देशाच्या स्वाभिमानाच्या रक्षण केले. लाखो मराठ्यांनी बलिदान दिले. या घटनेचे मोठे ऐतिहासिक स्मारक उभारणे गरजेचे होते. मात्र, अजूनही पानिपतचे स्मारक व्हायला वेळ लागत आहे,’ अशी खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी रविवारी व्यक्त केली.
भारत इतिहास संशोधक मंडळ आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित इतिहासकार गजानन मेहेंदळे यांच्या श्रद्धांजली सभेत गोपाल बोलत होते. भारतीय इतिहास संशोधन समितीचे (आयसीएचआर) अध्यक्ष रघुवेंद्र तंवर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष बी. डी. कुलकर्णी, भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत अध्यक्ष, सचिव पांडुरंग बलकवडे, नंदकुमार निकम या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात मेहेंदळेलिखित ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती सेवक,’ ‘शिवाजी हिज लाइफ अँड टाइम्स’ आणि ‘टिपू ॲज ही रिअली वॉज’ या ग्रंथांचे पुनर्प्रकाशन करण्यात आले.
गोपाल म्हणाले, ‘भारत हा एक देश नव्हता. इथे केवळ दारिद्र्य आणि मागासलेपण होते. हा देशही आमच्यामुळेच देश झाला, असा समज इंग्रजांनी अत्यंत हुशारीने इतिहासातून पेरला. आपल्या देशाला गुलाम ठेवण्यासाठी इंग्रजांनी आपला गौरवशाली इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगितला. भारतीयांनी जिंकलेल्या शेकडो लढाया कधी सांगितल्याच गेल्या नाहीत. इंग्रजांनी इतिहासाचे विकृतीकरण केले आणि तोच इतिहास आपल्याला शिकवण्यात येत होता.’
‘भारतीय इतिहासाला समजून घेण्यासाठी एक वेगळ्या दृष्टीची गरज पडणार आहे. भारताचा इतिहास हा केवळ राजा, लढाया या पुरता मर्यादित नाही. हा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर समग्र दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. त्यात लोकांच्या कल्याणासाठी काम करणारे राजे, इथला समाज, वैविध्यपूर्ण संस्कृती, तत्त्वज्ञान समजून घेणे आवश्यक आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
गजानन मेहंदळे यांनी दर्जेदार संशोधन केले. त्यांनी तटस्थपणे इतिहासातील घटनांचे वर्णन केले. त्यांचे सर्व साहित्य इंग्रजीत यायला हवे, नाही तर हा इतिहास जगभरात पोहचणार नाही, ही खूप मोठी विडंबना आहे. गजानन मेहंदळे यांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ‘आयसीएचआर’च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी संस्थेच्या आगामी बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. – रघुवेंद्र तंवर, अध्यक्ष, भारतीय इतिहास संशोधन समिती
मेहेंदळे यांच्या सर्व साहित्याचे पुन्हा प्रकाशन
गजानन मेहेंदळे यांचे प्रकाशित-अप्रकाशित सर्वच लिखाण पुन्हा प्रकाशित करण्याचा संकल्प भारत इतिहास संशोधन मंडळाकडून करण्यात आला आहे. मंडळामध्ये गजानन मेहेंदळे यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येणार असून, मेहेंदळे यांच्या पुस्तकांचा संग्रह तिथे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रदीप रावत यांनी सांगितले.
