RTE Admission 2026 Deadline Extended: राज्यातील शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता ३० एप्रिलपर्यंत कागदपत्र पडताळणी करून प्रवेश घेता येणार आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत सुमारे ३९ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले होते.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठीची आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील ८ हजार ७०१ शाळांमध्ये १ लाख १४ हजार ८२६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी २ लाख ८९ हजार २८६ अर्ज दाखल झाले. ६ एप्रिल रोजी प्रवेशासाठीची सोडत काढण्यात आली. त्यानंतर १० एप्रिल रोजी निवडयादी जाहीर करण्यात आली.

त्यात सर्वसाधारण गटातील १ लाख ५ हजार २२९, तर दिव्यांग गटातील ५८२ विद्यार्थ्यांचा, प्रतीक्षा यादीमध्ये सर्वसाधारण गटातील ८६ हजार ४, तर दिव्यांग गटातील ३० विद्यार्थ्यांचा समावेश होता. निवडयादीतील विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी करून प्रवेश घेण्यासाठी सुरुवातीला २० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, निवडयादी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश निश्चिती करण्यास पालकांचा संथ प्रतिसाद असल्याचे दिसून आले होते.

संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, सोमवारी सायंकाळपर्यंत सुमारे ३९ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला होता. या पार्श्वभूमीवर आता निवडयादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे निवडयादीतील पालकांना प्रवेशासाठी वाढीव दहा दिवस उपलब्ध झाले आहेत. निवडयादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रवेश

संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार आरटीई प्रवेशासाठीच्या सर्वाधिक जागा पुणे जिल्ह्यात उपलब्ध आहेत. तसेच आतापर्यंतचे सर्वाधिक १७ हजार ७२८ प्रवेश पुणे जिल्ह्यात झाले आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यात १० हजार ५७८, नागपूर जिल्ह्यात ६ हजार ९९२, नाशिक जिल्ह्यात ५ हजार ३२६, नाशिक जिल्ह्यात ४ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असल्याचे दिसून येते.