पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता पालकांना ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत २ लाख ७५ हजारांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. ‘आरटीई’ २५ टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाने १ किलोमीटरच्या अंतरातील शाळा निवडण्याची घातलेली अट उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आधी अर्ज भरलेल्या पालकांना पुन्हा अर्ज भरण्यासाठी, तसेच अर्ज न भरलेल्या पालकांना अर्ज भरण्याची संधी दिली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी एक किलोमीटरची अट रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे एक किलोमीटरच्या आतील शाळांची निवड करून अर्ज भरलेल्या पालकांना प्रवेशासाठी एक किलोमीटर, एक ते तीन किलोमीटर, तसेच तीन किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झाल्या आहेत. या अनुषंगाने संबंधित पालकांना प्रवेशाच्या संकेतस्थळावरील पालक लॉगिनमध्ये अर्ज ‘अनकन्फर्म’ करून पुन्हा ‘कन्फर्म’ करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यंदा प्रवेश प्रक्रियेंतर्गत ८ हजार ७०० शाळांमध्ये प्रवेशासाठी १ लाख १४ हजार ७८५ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत २ लाख ७५ हजार ६७९ अर्ज दाखल झाल्याचे आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून आले. आता शिक्षण संचालनालयाने अर्ज भरण्यास मुदतवाढ दिल्याने आणखी अर्जांची भर पडणार आहे.

गेल्यावर्षी राज्यभरातील ८ हजार ८६३ शाळांतील १ लाख ९ हजार १०२ जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आली. त्यासाठी ३ लाख ५ हजार १५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातून एकूण ८८ हजारांपेक्षा अधिक जागांवर प्रवेश झाले. तर सुमारे २१ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. तर २०२४मध्ये ७८ हजार जागांवर प्रवेश होऊन सुमारे २६ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रवेशांसाठीच्या जागा सुमारे पाच हजारांनी वाढल्या आहेत. तसेच सातत्याने प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा दुप्पट अर्ज दाखल होत आहेत. त्यामुळे यंदा किती अर्ज दाखल होतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

आरटीई प्रवेशासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रवेशासाठी पात्र विद्यार्थी निवडण्यासाठी सोडत काढली जाणार आहे. त्यातून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येईल. तसेच प्रतीक्षा यादीही तयार केली जाणार आहे. सोडतीतून प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिल्यानंतर जागा रिक्त राहिल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात येणार आहे.