पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा उच्चांकी प्रवेश झाले आहेत. एकूण पाच फेऱ्यांतून ९६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थी आठ हजारांनी वाढल्याचे स्पष्ट झाले असून, सुमारे १७ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.
आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतात. शिक्षण विभागाने आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी यंदा नियमांत बदल केला होता. त्यानुसार विद्यार्थ्याच्या घरापासून एक किलोमीटरच्या परिसरातील शाळेत प्रवेश बंधनकारक करण्यात आला होता. त्यानुसार नोंदणी प्रक्रियाही करण्यात आली. मात्र, या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने शिक्षण विभागाचा नियम रद्द करण्याचा आदेश दिला. त्यामुळे विद्यार्थ्याच्या घरापासून तीन किलोमीटर परिसरातील शाळा प्रवेशाची संधी पुन्हा उपलब्ध झाली. परिणामी, पुन्हा अर्ज नोंदणी करून प्रवेश प्रक्रिया राबवण्यास विलंब झाला.
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील ८ हजार ७०१ शाळांतील १ लाख १४ हजार ८२६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. त्यासाठी एकूण २ लाख ८९ हजार २८६ अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठी काढण्यात आलेल्या ऑनलाइन सोडतीमध्ये १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यापैकी ७९ हजार ८६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्यानंतर उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यासाठी चार फेऱ्या राबवण्यात आल्या. ३१ जुलै रोजी प्रवेश प्रक्रिया संपुष्टात आली. त्यातून नियमित विद्यार्थी, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी मिळून एकूण ९६ हजार ९९० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्याचे आरटीई प्रवेशाच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.
राज्यात आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबवण्यात सुरुवात झाल्यापासून गेल्यावर्षी सर्वाधिक ८८ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. मात्र, यंदा प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या ८ हजारांनी वाढली असून, आजवरचे सर्वाधिक ९६ हजारांहून अधिक प्रवेश झाले. गेल्या वर्षी सुमारे २१ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा रिक्त जागा सुमारे १७ हजारापर्यंत कमी झाल्या आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच प्रवेश संख्या एक लाखांजवळ आल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, शासन निकषांनुसार आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात एक नियमित आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी चार अशा एकूण पाच फेऱ्या राबवण्यात आल्या. त्यातून ९६ हजारांहून अधिक प्रवेश झाले. ही संख्या आरटीई प्रवेशांची आजवरची सर्वाधिक प्रवेशसंख्या ठरली आहे. पुढील वर्षी लवकर प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे नियोजन केले जाणार आहे.
सर्वाधिक प्रवेश पुणे जिल्ह्यात, सर्वांत कमी सिंधुदुर्गात
प्रवेश प्रक्रियेत सर्वाधिक १६७५८ प्रवेश पुणे जिल्ह्यात झाले आहेत. त्याशिवाय ठाणे जिल्ह्यात ९३१५, नागपूर जिल्ह्यात ६२७४, नाशिक जिल्ह्यात ४९२९, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४४४४, अहिल्यानगर जिल्ह्यात ३४०५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. तर सर्वांत कमी १३१ प्रवेश सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले. नंदुरबार जिल्ह्यात ३२८, गडचिरोली जिल्ह्यात ४८२, रत्नागिरी जिल्ह्यात ६०३, हिंगोली जिल्ह्यात ८०३, भंडारा जिल्ह्यात ८६२, वाशिम जिल्ह्यात ९०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याचे संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.
