प्रक्रिया मंदगतीने; ९ जुलैपर्यंत मुदतवाढ

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के  राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया मंदगतीने होत आहे. प्रवेशांसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या मुदतीत जेमतेम २५ टक्के च प्रवेश निश्चित झाले असून, प्रवेशांसाठी आता ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आरटीईअंतर्गत राज्यात ९ हजार ४३२ शाळांमध्ये ९६ हजार ६८४ जागा यंदा उपलब्ध आहेत. शिक्षण विभागाने मार्चमध्ये जाहीर के लेल्या सोडतीमध्ये ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले. करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया सुरू करून ११ ते ३० जून दरम्यान प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र या मुदतीत ३६ हजार ४४५ विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेश देण्यात आले आहेत, तर २३ हजार २०५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येते. प्रवेशांसाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांनी स्पष्ट के ले.

ठाणे जिल्ह्याची आघाडी

आतापर्यंत निश्चित झालेल्या प्रवेशांमध्ये ठाणे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. ठाणे जिल्ह्यात २ हजार ५९५, पुणे जिल्ह्यात २ हजार ४२८, जळगाव जिल्ह्यात १ हजार ९४२, नाशिक जिल्ह्यात १ हजार ५६२ प्रवेश झाले आहेत. राज्यात के वळ या चारच जिल्ह्यांमध्ये चार आकडी प्रवेश झाले आहेत.