scorecardresearch

आरटीई प्रवेश प्रक्रिया मंद गतीने; प्रवेशासाठीची मुदत संपत येऊनही १७ ते १८ टक्केच प्रवेश निश्चित

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १७ ते १८ टक्केच विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याचे दिसून येत आहे.

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १७ ते १८ टक्केच विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया मंद गतीने होत असून, प्रवेशांसाठी मुदतवाढ द्यावी लागण्याची शक्यता आहे.  आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील  विद्यार्थ्यांसाठी आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील ९ हजार ८६ शाळांमध्ये मिळून प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या १ लाख १ हजार ९०६ जागांसाठी २ लाख ८२ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काढलेल्या सोडतीमध्ये ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी १९ एप्रिलची मुदत देण्यात आली होती.

आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरील आकडेवारीचा आढावा घेतला असता शनिवारी सायंकाळपर्यंत जेमतेम १५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे दिसून आले. प्रवेशासाठी दिलेली मुदत संपण्यास केवळ तीन दिवस बाकी असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशांसाठी मुदतवाढ द्यावी लागण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rte admission process slows down deadline admission admission guaranteed ysh

ताज्या बातम्या