जप्त केलेल्या वाहनांचा ‘आरटीओ’कडून लिलाव

मोटार वाहन कर न भरल्याने ‘आरटीओ’कडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा १३ फेब्रुवारीला लिलाव करण्यात येणार आहे.

मोटार वाहन कर न भरल्याने ‘आरटीओ’कडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा १३ फेब्रुवारीला लिलाव करण्यात येणार आहे. लिलावात २१ वाहनांचा समावेश आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत थकबाकीदारांना कर भरण्याची संधी देण्यात येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
कर न भरल्याने जप्त करण्यात आलेली वाहने स्वारगेट, कोथरूड, हडपसर, कात्रज, पीएमपी डेपो, पुणे व आळंदी आरटीओ कार्यालय येथे ठेवण्यात आली आहेत. १३ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता या वाहनांचा पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लिलाव करण्यात येणार आहे. लिलाव होणाऱ्या वाहनांमध्ये १४ टुरिस्ट टॅक्सी, तीन बस, चार एचजीव्ही आदी वाहनांचा समावेश आहे.
लिलावात ठेवण्यात येणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, आरटीओ कार्यालयात लावण्यात आली आहे. इच्छुकांना वाहनांची प्रत्यक्ष पाहणी वाहने ठेवलेल्या ठिकाणी करता येणार आहे. लिलावाच्या अटी व नियम आरटीओ कार्यालयामध्ये सूचना फलकावर सकाळी ११ ते संध्याकाळी पाच या वेळेत पाहता येईल. लिलावात ठेवण्यात येणाऱ्या वाहनांच्या मूळ मालकांना कर व दंड भरण्यासाठी लिलावाच्या तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rto auction seize tax