पुणे शहराचा विस्तार व लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) प्रामुख्याने वाहन परवाना काढण्यासाठी येणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. त्यामुळे या कार्यालयाची क्षमता आता संपली आहे. त्यातून शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी नागरिकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा परिस्थितीत संगम पुलाजवळील आरटीओ कार्यालयासह शहराच्या उपनगरांमध्येही कार्यालय सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबतचा प्रस्तावही शासन दरबारी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
वाहन चालविण्याच्या शिकाऊ परवान्यासाठी संगम पूल येथील आरटीओ कार्यालयामध्ये चाचणी घेण्यात येते. सध्या या परवान्यासाठी नागरिकांना ऑनलाइन अर्ज सादर करून चाचणीची वेळ घ्यावी लागते. या एकाच कार्यालयामध्ये शिकाऊ परवान्याच्या चाचणीची व्यवस्था असल्याने चाचणी घेण्याच्या संख्येवर मर्यादा येते. रोज सरासरी साडेतीनशे ते चारशे नागरिकांना शिकाऊ वाहन परवाना देण्यात येतो. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या व त्यानुसार परवाना मागणाऱ्यांची संख्या पाहता आता ही व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. परवाना मिळविण्यासाठी नागरिकांना मोठय़ा कालावधीची प्रतीक्षा करावी लागते. त्यातून परवान्याच्या या प्रक्रियेत गैरव्यवहारालाही तोंड फुटते आहे.
परवान्यासाठी नागरिकांना करावी लागणारी दीर्घ प्रतीक्षा व त्यातून होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आरटीओ कार्यालयातील क्षमता वाढविण्याची गरज आहे. मात्र, जागेअभावी त्याला मर्यादा आहेत. विश्रांतवाडी कार्यालयामध्ये शिकाऊ वाहन परवान्याची चाचणी घेण्यासाठी यापूर्वी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. मात्र, हा कक्ष वापराविना धूळ खात पडून आहे. हा कक्ष सुरू झाल्यास येरवडा ते विश्रांतवाडी आदी भागातील नागरिकांची सोय होऊ शकते. त्याचप्रमाणे शहराच्या उपनगरांमध्येही विविध ठिकाणी कार्यालये सुरू होण्याची गरज आहे.
उपनगरांमध्ये कार्यालय सुरू करण्याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे माजी सदस्य बाबा शिंदे यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे मागणी केली आहे. विश्रांतवाडी कार्यालयामध्ये दोनशे नागरिकांना दररोज शिकाऊ परवाना देण्याची व्यवस्था होऊ शकते. त्याचप्रमाणे बावधन, हडपसर, कात्रज या भागामध्ये आरटीओ कार्यालय सुरू करण्यासाठी सरकारी जागा उपलब्ध आहेत. त्याबाबतचा प्रस्तावही यापूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाचा विचार व्हावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.