शिकाऊ वाहन परवाना काढण्याच्या परीक्षेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून राबविण्यात येणारी ऑनलाईन यंत्रणा शुक्रवारी कोलमडल्याने नागरिकांची गैरसोय झाली. सकाळपासून ताटकळलेल्या नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. पुणे मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने याबाबत आक्षेप नोंदविल्यानंतर परवान्यासाठी आलेल्या नागरिकांची जुन्या पद्धतीने परीक्षा घेण्यात आली.
शिकाऊ व पक्का वाहन परवाना काढण्यासाठी सध्या ऑनलाईन पद्धत वापरण्यात येत आहे. उमेदवाराला अर्जही ऑनलाईन सादर करावा लागतो. अर्ज सादर करतानाच परीक्षेची तारीख व वेळही घ्यावी लागते. सध्या शिकाऊ परवान्याच्या परीक्षेसाठी अर्ज सादर केल्यापासून तीन ते चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते. मोठय़ा प्रतीक्षेनंतर शिकाऊ वाहन परवान्याच्या परीक्षेसाठी शुक्रवारीही मोठय़ा संख्येने उमेदवार आरटीओ कार्यालयात आले होते. सकाळपासूनच ऑनलाईन परीक्षेची यंत्रणा कोलमडली होती. विशेष म्हणजे त्या ठिकाणी यंत्रणेचे चालकही उपस्थित नव्हते. त्यांना पर्यायी व्यक्तीही त्या ठिकाणी नव्हता. त्यामुळे परीक्षार्थीचा खोळंबा झाला होता.
पुणे मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी ही बाब अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. मात्र, त्यानेही काही फरक पडला नाही. त्यामुळे परीक्षेसाठी खोळंबलेल्या नागरिकांसह घाटोळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यामुळे दुपारनंतर नागरिकांची जुन्या पद्धतीनुसार परीक्षा घेण्यात आली. याबाबत घाटोळे म्हणाले, की परवान्यासाठीच्या ऑनलाईन स्टॉल यंत्रणेमध्ये त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन सचिव यांच्याकडे लेखी पाठपुरावा केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याविषयी आव्हानही देण्यात आले आहे. यंत्रणा सक्षम नसल्याने नागरिकांना त्रास होतो. वेळ वाचण्यापेक्षा त्रास वाढतो आहे. त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय झाला पाहिजे.