जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे सतर्कता

पुणे : दक्षिण आफ्रिकेतील करोना विषाणूच्या उत्परिवर्तीत ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच गेल्या चार ते पाच दिवसांत विमानतळावर उतरून जिल्ह्याच्या विविध भागात गेलेल्या नागरिकांचा शोध घेऊन संबंधितांची आरोग्य तपासणी करण्याचेही आदेश डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी, तपासणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. तसेच गेल्या चार ते पाच दिवसांत परदेशातून जिल्ह्यात प्रवेश केलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची देखील चाचणी करण्याचे आदेश पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या करोनाच्या उत्परिवर्तीत विषाणूच्या संसर्गाचा प्रभाव पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य शासनाने राज्यात ठिकठिकाणी आलेल्या प्रवाशांची माहिती घेण्याबाबत आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून सोमवारी सकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेऊन खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.  याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘लोहगाव विमानतळावर आलेल्या प्रवाशांची माहिती मुख्यमंत्री आणि सचिवांना देण्यात आली असून महानगरपालिकेचे आरोग्य विभाग तपासणी पथक विमानतळावर यापूर्वीपासून कार्यरत आहे. राज्य शासनाच्या नवीन आदेशानुसार परदेशातून आलेल्या प्रवाशांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असल्या, तरी संबंधित प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.’

ओमायक्रॉन या करोनाच्या उत्परिवर्तीत विषाणूच्या प्रादुर्भावाची शक्यता गृहित धरून शहरासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच खबरदारी म्हणून तत्काळ अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करण्यात येणार आहे. शहरासह जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी लशीची पहिली किंवा दुसरा मात्रा घेण्यात आली आहे, त्यांची स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेण्यास सुरवात केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी