पुणे : विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. समाजमाध्यमातून रविवारी पाठविण्यात आलेल्या संदेशामुळे प्रवाशांमध्ये घबराट उडाली. विमानतळ प्रशासन, तसेच बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केल्यानंतर विमानात बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही.

याप्रकरणी समाजमाध्यमातील खाते वापरकर्ता (स्क्रिझोफ्रेनिया १११) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विमानतळ प्रशासनाकडून मुनीष कोतवाल (वय ४३) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावरुन रविवारी (२० ऑक्टोबर) दुपारी सिंगापूरला निघालेल्या एका खासगी विमान कंपनीच्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा संदेश समाजमाध्यमातील खात्यावरुन पाठविण्यात आला. संबंधित संदेश विमानतळ प्रशासनाने पाहिला. त्यानंतर तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात दिली.

हेही वाचा – ‘एग्झिट पोल’ची पारदर्शकता वाढवा!

पोलिसांचे बॉम्ब शोधक नाशक पथक आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी विमानतळाची तपासणी केली. तेव्हा विमानात बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांनी घटनास्थळी भेट दिली. बॉम्ब ठेवल्याची धमकी, तसेच अफवा पसरविणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. समाजमाध्यमातील ज्या खात्याचा वापर करुन संदेश पाठविण्यात आला. त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक करपे तपास करत आहेत.

हेही वाचा – वसाहतवाद, विकास आणि विषमतेच्या इतिहासातून भविष्याकडे…

खासगी विमान कंपनीच्या तीन विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा समाजमाध्यमातून पसरविल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी घडली होती. लखनऊहून पुण्यात येत असलेल्या विमानात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती. त्यानंतर विमानतळ प्रशासन, पोलिसांनी विमानाची तपासणी केली. तेव्हा बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही.

Story img Loader