पुण्यातील पटवर्धन बाग परिसरात एका शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनने अचानक पेट घेतला. आगीत व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली असली तरी यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना गुरुवारी (दि. ६) दुपारी १२. ३० च्या सुमारास घडली.
व्हॅनमध्ये १० विद्यार्थी होते. ही व्हॅन मुलांना शाळेतून घरी सोडण्यासाठी जात होती. पटर्वधन बागेजवळ आल्यानंतर व्हॅनच्या मागील बाजूने धूर येत असल्याचे दिसले व गाडीने अचानक पेट घेतले. यानंतर चालकाने मुलांना गाडीतच ठेऊन तेथून पळ काढला. आजूबाजूच्या नागरिकांना हे लक्षात आल्याने त्यांनी लगेचच विद्यार्थ्यांना बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीत व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली.
आग नेमकी कशी लागली याचे कारण समजू शकलेले नाही. व्हॅनमधील सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. घटनास्थळी लगेचच पोलीस आणि अग्निशामक दलाने धाव घेतली. व्हॅन कुठल्या शाळेतील आहे याची नेमकी माहिती मिळू शकली नव्हती.