पुणे : पुणे विमानतळावरील समस्यांची मालिका अद्याप सुरूच आहे. नवीन टर्मिनल सुरू होऊनही प्रवाशांच्या अडचणीत भर पडत आहे. पुणे विमानतळावरील धावपट्टी बुधवारी अर्धा तास बंद ठेवण्यात आली. यामुळे या काळात पुण्यात येणारी तीन विमाने मुंबईला वळविण्यात आली. याचबरोबर अनेक विमानांना विलंब झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांचीसाठी हा प्रवास ‘वाऱ्यावरची वरात’ ठरला. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पुण्यातील असूनही समस्या सुटत नसल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. पुणे विमानतळावरील धावपट्टी दररोज सकाळी ८ ते १०.३० या वेळेत प्रवासी विमानांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येते. पुणे विमानतळ हे हवाई दलाचे असून, या कालावधीत हवाई दलाचा सराव आणि इतर कामे सुरू असतात. त्यामुळे प्रवासी विमानांचे उड्डाण होत नाही आणि ही विमाने विमानतळावर उतरूही शकत नाहीत. हवाई दलाने बुधवारी अरितिक्त अर्ध्या तासासाठी धावपट्टी ताब्यात घेतली. त्यामुळे प्रवासी विमानांसाठी सकाळी ८ ते ११ या वेळेत प्रवासी विमानांची ये-जा बंद राहिली. याचबरोबर अनेक विमानांना दोन ते तीन तासांहून अधिक विलंब झाला. आणखी वाचा-इतिहास विकण्याचा नवा धंदा! खासदार सुप्रिया सुळेंचा रोख कुणावर पुणे विमानतळावरील धावपट्टी अतिरिक्त अर्धा तासासाठी सकाळी १०.३० ते ११ या वेळेते बंद राहिल्याने त्यावेळी नियोजित विमानांचे वेळापत्रक कोलमडले. या कालावधीत दिल्ली-पुणे ही दोन विमाने आणि चेन्नई-पुणे हे एक विमान विमानतळावर येणार होते. धावपट्टी बंद असल्याने ही तिन्ही विमाने मुंबईला वळविण्यात आली. यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक प्रवाशांना ऐनवेळी ही माहिती देण्यात आल्याने त्यांच्या पुढील प्रवास नियोजनावर पाणी फिरले. याबद्दल अनेक प्रवाशांनी समाज माध्यमावर नाराजी व्यक्त केली आहे. पुणे विमानतळावरील धावपट्टी हवाई दलाने अतिरिक्त अर्ध्या तासासाठी ताब्यात घेतली होती. त्यामुळे या अर्ध्या तासातील नियोजित विमानांना फटका बसला. या कालावधीतील तीन विमाने दुसरीकडे वळविण्यात आली. -संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ आणखी वाचा-पिंपरी : राष्ट्रवादीने चिंचवडवर दावा केल्यानंतर आता भाजपचा ‘या’ मतदारसंघावर दावा विमानतळावर तीन तास आधी बोलावतात. पुणे ते बंगळुरू हे विमान तब्बल सहा तास पुढे ढकलण्यात आले. आम्ही नऊ तासांपासून विमानतळावर बसून आहोत आणि आम्हाला जेवणही देण्यात आले नाही. एअर इंडियाचे कर्मचारी केवळ वैमानिकामुळे विमानाला विलंब झाल्याचे कारण देत आहेत. -प्रवासी दिल्ली ते पुणे हे विमान पुणे विमानतळावरील धावपट्टी उपलब्ध नसल्याने सकाळी १०.४५ वाजता मुंबईला वळविण्यात आले. हे विमान मुंबईहून दुपारी १२.४४ वाजता निघून पुण्यात दुपारी १.०५ वाजता पोहोचले. -विस्तारा