Rupali Thombre Patil Slams Vidyanand Bapat: सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापराला विरोध करणारे विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी टिळक रोड परिसरात हल्ला झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत बापट यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. तसेच, पुण्याचा गणेशोत्सव आणि त्यामागची १३० वर्षांची परंपरा अधोरेखित करत “पुणेकरांचा सण पुणेकरच ठरवणार”, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

पुणेकरांना गणेशोत्सव साजरा करायला शिकवू नये – रुपाली ठोंबरे पाटील

बापट हे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापराविरोधात भूमिका मांडत आहेत. गुरुवारी टिळक रोड परिसरात टीव्ही९ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना संतोष चव्हाण याने त्यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले. चव्हाण याने बापट यांच्या तोंडावर फटका मारला. दरम्यान, या पार्श्वभूमीवर रुपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बापट यांच्या पुणेकर असण्यावरच प्रश्न उपस्थित केला आहे. “रत्नागिरीहून ७ वर्षांपूर्वी पुण्यात नोकरीला आलेल्या माणसाने पुणेकरांना गणेशोत्सव कसा साजरा करावा हे शिकवू नये,” असे त्यांनी म्हटले आहे.

१३० वर्षाची परंपरा

“विद्यानंद बापट हे पुणेकर नाहीत म्हणून गणपती बाप्पा उत्सवाला गालबोट लावण्याची हिंमत झाली”, अशी टीका करत, “पुणे म्हणजे काय हे पुण्यात जन्मलेल्या रक्तालाच कळतं”, असे ठोंबरे पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. “गणपती कार्यकर्ता नारायण पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, श्रीमंत थोरले,बाजीराव रस्त्यावर लहानाचे मोठे झालेत. पेठेत घराघरांतून, दुकानातून वर्गणी काढून गणपती बाप्पा उत्सव साजरे करण्याचा १३० वर्षाची परंपरा आहे हो. इथे ढोलाच्या थापेवर कार्यकर्त्यांचे बालपण गेलंय, गणपतीच्या वर्गणीसाठी गणपती कार्यकर्ते उन्हात फिरले, फक्त DJ चा विषयच नाही”, असे ठोंबरे पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Rupali Thombare Patil FB Post Screenshot
Rupali Thombare Patil FB Post Screenshot

पुण्याची संस्कृती समजून घ्यावी लागेल

“पुण्यात राहायचं असेल तर पुण्याची संस्कृती समजून घ्यावी लागेल, तिला विरोध करून प्रसिद्धी मिळवता येणार नाही. नाहक प्रसिद्धीच्या नादात आमच्या पुण्याचे नाव खराब नको, आमच्या गणपती उत्सवाला गालबोट नको”, असे ठोंबरे पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. “आमचा गणेशोत्सव, आमचा अभिमान. पुणेकरांचा सण पुणेकरच ठरवणार आणि पुण्याचा गणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्योत्सव आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

रविवारी होणाऱ्या मोर्चाबाबत विद्यानंद बापट काय म्हणाले?

विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर बापट यांच्या समर्थनार्थ आणि ‘डीजेमुक्ती’साठी रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात विद्यानंद बापट यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलं. “मी जिवंत असेन तर मोर्चात सहभागी होणार आहे”, असं बापट म्हणाले. “मला भिती वाटत नाही. पण डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचं काय झालं, ते मॉर्निंग वॉकला निघाले होते. त्यामुळे केव्हा काय होईल हे मी सांगू शकत नाही. त्यामुळे जर मोर्चात जाण्यायोग्य परिस्थितीत मी असेन तर मोर्चात सहभाही होणार आहे”, असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे.