वीज तोडण्याची भीती घालून सामान्यांना गंडा घालण्याचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी विश्रांतवाडी भागातील एका नागरिकाला वीज तोडण्याची भीती घालून चार लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक तपासात सायबर चोरटे बिहारमधील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तक्रारदार धानोरी भागात राहायला आहेत. तक्रारदाराच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. वीज देयक न भरल्यास वीज कापण्यात येईल, असे संदेशात म्हटले होते. त्यानंतर तक्रारदाराने चोरट्यांनी संदेशात दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्यांनी महावितरणमधील अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली.

तातडीने वीज देयक भरावे लागेल, अशी बतावणी चोरट्यांनी केली होती. त्यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. चोरट्यांच्या बतावणीवर विश्वास ठेऊन तक्रारदाराने ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरली. तक्रारदाराच्या बॅंक खात्यातून चार लाख रुपयांची रोकड लांबविली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रार देण्यात आली.

महावितरणकडून अधिकृत संदेश पाठविण्यात येतो. सायबर चोरटे संदेश पाठविण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकाचा वापर करतात. चोरटे ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकावर थेट संपर्क साधून वीज तोडण्याची भीती घालतात. रात्री अपरात्री चोरटे ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून बतावणी करत असून चोरट्यांच्या बतावणीवर ग्राहकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.