रॉयटर्स, कीव्ह: रशियाने मंगळवारी युक्रेनमध्ये विविध शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. यात १८ जणांचा मृत्यू, तर १०० हून अधिक जखमी झाले. हल्ल्यांमध्ये कीव्ह, निप्रो या शहरांचाही समावेश आहे. युक्रेनच्या रशियाच्या ताब्यातील लुहान्स्क भागात गेल्या महिन्यात युक्रेनने हल्ले केले होते. त्यानंतर रशियाने युक्रेनवर हल्ले करण्याचा इशारा दिला होता. लुहान्स्क भागात आपण हल्ले केले नसल्याचा दावा युक्रेनने केला होता.
रशियाने युक्रेनवर केलेला या महिन्यातील हा तिसरा सर्वांत मोठा हल्ला होता. अमेरिका इराण युद्धात आणि कराराच्या बोलण्यांमध्ये गुंतली असल्याने युक्रेन युद्ध थांबविण्याची बोलणी तूर्तास थांबली आहेत. या काळात युक्रेन रशियामधील तेल शुद्धीकरण प्रकल्पांना सातत्याने लक्ष्य करीत आहे.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेल्येन्स्की म्हणाले, ‘‘रशियाने ७३ क्षेपणास्त्रे आणि ६०० हून अधिक ड्रोन्सचा मारा केला. अमेरिकेने पॅट्रियट क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्रे पाठवून युक्रेनचा शस्त्रसाठा पूर्ववत करावा. अमेरिकेने हे केले नाही, तर असे हल्ले सुरूच राहतील.’’
युक्रेनने अमेरिकेकडे हवाई सुरक्षा प्रणालीचीही मागणी केली आहे. युक्रेनच्या कृत्यानंतर युद्धाचे नवे पर्व आता सुरू झाले आहे, अशी प्रतिक्रिया रशियाने दिली आहे.
