पुणे : ‘जागतिक पटलावर सत्तेची अनेक केंद्रे उदयाला येत असून, अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अनिश्चित आंतरराष्ट्रीय संबंधांकडे आपण वाटचाल करत आहोत. अशा परिस्थितीत देशासमोर जास्तीत जास्त पर्याय खुले ठेवून निर्णय आणि निवड स्वातंत्र्य ठेवण्याचे परराष्ट्र धोरण आहे,’ अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी दिली.

आगामी काळात शेजारील राष्ट्रांना पहिली पसंती देण्यात येणार आहे. त्यानंतर आखाती देश, अग्नेय आशिया आणि मध्य आशियातील संबंधांवर भर देण्यात येणार असून, ‘ग्लोबल साउथ’द्वारे विकसनशील देशांची एकजूट करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सिंबॉयसेस विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात एस. जयशंकर बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. स्वाती मुजुमदार, संचालक डॉ. विद्या येरवडेकर, डॉ. राजीव येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्ण रमन, डॉ. श्रद्धा चितळे आदी या वेळी उपस्थित होते.

‘जागतिक पटलावर सत्तेची अनेक केंद्रे उदयाला आली आहेत. व्यापार, ऊर्जा, लष्कर, तंत्रज्ञान अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. कोणताही आणि कितीही शक्तिशाली देश इतर देशांवर त्याची इच्छा लादू शकत नाही. राष्ट्रीय नव्हे तर प्रादेशिक लाभासमोरही जागतिक हिताकडे दुर्लक्ष होताना दिसते. आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेले जागतिकीकरण राजकीयदृष्ट्या मात्र मागे पडले. समाजात जोखीम घेण्याची वृत्ती वाढली असून, जगातील अनेक ठिकाणी ऐतिहासिक वाद पुन्हा उफाळून येत आहेत. समाजात जोखीम घेण्याची वृत्ती वाढली आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अनिश्चित आंतरराष्ट्रीय संबंधांकडे जगाची वाटचाल होत आहे.’ असे जयशंकर यांनी नमूद केले.

ते म्हणाले, ‘जागतिक पटलावर झपाट्याने बदल घडत आहेत. ८० वर्षांपूर्वीची जागतिक व्यवस्था आता विस्कळीत होत आहे. मोठ्या राष्ट्रांचे राजकारण आणि धोरणांवर त्याचे खापर फोडले जाते. मात्र, बदलांच्या मुळाशी जागतिकीकरण, रिबॅलेंसिंग, मल्टीपोलारिटी हे घटक आहेत. त्यात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे तिन्ही घटक वेगाने बदलत आहेत. प्रत्येक क्षेत्रावर त्यांचा प्रभाव विस्तारतो आहे.’

बदलत्या काळात टिकून राहण्यासाठी ‘मेक इन इंडिया’वर भर देत आपली उत्पादने परकीय बाजारपेठांमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याला ‘डिझाईन इन इंडिया,’ ‘रिसर्च इन इंडिया,’ ‘इनोव्हेट इन इंडिया,’ आणि ‘डिलिव्हर फॉर्म इंडिया’ची जोड द्यायला हवी. नाही तर, इतर राष्ट्रांसाठीची ‘बाजारपेठ’ म्हणूनच आपले अस्तित्व उरेल. आता योग्य धोरणांबरोबरच पायाभूत सुविधा सुधाराव्या लागतील आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करावी लागेल, अशी अपेक्षा एस. जयशंकर यांनी व्यक्त केली.

‘दशकभरातील विकासा’ला उद्देशून एस. जयशंकर म्हणाले,

  • पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्याने आणि सकारात्मकतेने भारताकडे पाहिले जाते. आपल्या देशाविषयीचे जुने समज मागे पडत असून, राष्ट्राची प्रतिमा सुधारली आहे. देशामध्ये वाढणारे ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’ याची साक्षच आहेत.
  • गेल्या दशकभरात देशातील उच्च शिक्षण संस्थांची संख्या दुप्पट झाली. विकसित देशांना कुशल मनुष्यबळ शोधण्यासाठी धावपळ करावी लागते. त्याच वेळी आपल्या देशात प्रशिक्षित मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे.
  • आजही जागतिक व्यवस्थेवर वसाहतवादाचा प्रभाव दिसतो. त्यामुळे आपल्या चालीरीती लोकप्रिय करणे, नव्या कल्पना मांडणे आणि नव्या व्यासपीठांची उभारणी अत्यंत गरजेची आहे. त्यादृष्टीने आपल्या देशात गेल्या दशकभरापासून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत.