पुणे : आपल्या देशात कधीकाळी आघाडीच्या राजकारणाचा काळ होता. आज संपूर्ण जगातच आघाडीच्या राजकारणासारखी स्थिती आहे. कुणाकडेही स्पष्ट बहुमत नाही, कोणत्या आघाडीकडेही बहुमत नाही. त्यामुळे सतत परिस्थिती बदलत आहे. अशावेळी आपण परिस्थितीनुसार चपळतेने राष्ट्रीय हितावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे मत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मांडले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात डिप्लोमसी टू डिस्कोर्स या विषयावरील सत्रात जयशंकर बोलत होते. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक यांनी संवाद साधला. या संवादात डॉ. जयशंकर यांनी त्यांच्या आवडीची पुस्तके, वाचन, देशाचे परराष्ट्र धोरण, बदलती जागतिक परिस्थिती अशा अनुषंगाने भाष्य केले.
सध्याची जागतिक परिस्थिती आणि भारताची भूमिका यासंदर्भात आघाडीच्या राजकारणाचे उदाहरण देऊन जयशंकर म्हणाले, सध्या जगात आघाडीच्या राजकारणासारखी स्थिती आहे. कोणाकडेही स्पष्ट बहुमत नाही. त्या त्या दिवशी कोणते पक्ष एकत्र येतात यावर समीकरणे ठरतात. मात्र, ही स्थिती नेहमीच बदलत असते. याचाच अर्थ आपण चपळ राहणे गरजेचे आहे. कधी एखाद्या मुद्द्यावर एका देशासोबत, तर दुसऱ्या मुद्द्याबाबत दुसऱ्या देशाबरोबर असावे लागते. या बाबत माझ्या देशासाठी काय उपयुक्त, हिताचे आहे, तोच माझा पर्याय असेल हा माझा मुलभूत सिद्धांत आहे.
आपले शेजारी आपल्यापेक्षा लहान आहेत, ते आपल्याशी संबंधित आहेत. त्यांच्याकडेही राजकारण होते. ते कधी आपल्यावर टीका करतात, कधी आपले कौतुक करतात. कारण, आपण त्यांच्या राजकारणाचाही भाग आहोत. अशावेळी त्यांच्याशी संबंध स्थिर राहतील याची खात्री करावी लागते. श्रीलंकेत आलेल्या चक्रीवादळावेळी भारतानेच सर्वप्रथम मदत केली. करोना काळात शेजारी राष्ट्रांना लस पुरवली. युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर गहु, पेट्रोल, खतांचा पुरवठा थांबल्यावर ते भारताने उपलब्ध करून दिले. त्यामुळे कुटुंबाप्रमाणे जबाबदारीने वागणे महत्त्वाचे आहे. परराष्ट्र धोरण ठरवताना निवड करावी लागते, स्पष्टता असावी लागते. मात्र, आपल्यासाठी हितकारक काय हे पाहिले पाहिजे, असे डॉ. जयशंकर यांनी सांगितले.
भारत ‘ग्लोबल ब्रँड’
आपण कधी बोलायचे, कधी नाही बोलायचे हे परिस्थितीवर अवलंबून आहे. आताच्या स्पर्धात्मक काळात आपण बोललो नाही, तर दाबून टाकले जाईल. त्यामुळे आवाज उठवण्याचीही गरज आहे. मात्र, अंदाज घेऊन बोलले पाहिजे. देशाची ओळख नेतृत्त्वाने, दूरदृष्टीने होते. त्याच्या अंमलबजावणीसाठी लोक आहेत. दूरदृष्टी, नेतृत्त्व, आत्मविश्वासामुळे फरक पडतो. ‘ब्रेन ड्रेन’ हा व्यामिश्र विषय आहे. जगातील संधी भारतासाठी खुल्या होत आहे. रशियात नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. जगात भारताचा ‘ग्लोबल ब्रँड’ निर्माण झाला आहे. त्याचा फायदा घेऊन तरुणाईने जगाकडे ‘ग्लोबल वर्कप्लेस’ म्हणून पाहिले पाहिजे, असेही जयशंकर यांनी सांगितले.
युरोपला सहकारी करण्यासाठी प्रयत्नांची गरज
आताच्या काळात अमेरिकेशी संवाद साधणे कठीण झाले आहे. चीनचे व्यवस्थापन गुंतागुंतीचे झाले आहे. युक्रेन युद्ध, रशियापासून दूर जाण्यासाठीच्या दबावामुळे रशियाला पुनर्खात्री देणे गुंतागुंतीचे झाले आहे. जपानला सोबत आणण्यासाठी वेग वाढवण्याचा प्रयत्न आहे. अशावेळी युरोपला आपला महत्त्वाचा सहकारी करण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
