पुणे : राज्यात परतल्यानंतर मतदार संघातील नागरिक आणि कार्यकर्त्यांना काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न बंडखोर आमदारांना पडला आहे. उत्साहाच्या भरात केलेली बंडखोरी त्यांच्यासाठी अडचणीची ठरणार आहे, असे मत शिवसेना संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी येथे व्यक्त केले.

शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना आणि सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा मेळावा घेण्याचेही शिवसेनेच्या कार्यकारिणीत निश्चित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. हेवेदावे बाजूला ठेवून शिवसेना प्रमुखांच्या पाठीमागे ठाम उभे राहण्यात येईल, असा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आणि अन्य प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. दरम्यान, मेळाव्यानंतर पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आणि बंडखोरीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. कोणावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. मात्र बंडखोर आमदारांना तोंड दाखवायला जागा नाही. पक्षनेतृत्वावर अविश्वास दाखवून त्यांनी बंडखोरी केली आहे. शिवसैनिकांची दिशाभूल करण्यासाठी शिवसेनेतच असल्याचे त्यांच्याकडून भासविले जात आहे. कोणाकडे किती संख्याबळ हे विधानसभेत येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल, मात्र जनतेला कसे तोंड देणार, हा प्रश्न बंडखोर आमदारांना पडला आहे. उत्साहात केलेली ही कृती त्यांना अडचणीत आणणार आहे, असे सचिन आहिर यांनी सांगितले.