मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ४४ व्या वाढदिवसा निमित्त देशभरातील क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाला उधाण आले आहे. विविध उपक्रम राबवून लाडक्या सचिनचा वाढदिवस देशभरात साजरा होताना दिसतोय. यात पुणे देखील मागे नाही. पुण्यात शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्त गाण्याची मैफल रंगली आहे. प्रसिध्द गायक प्रशांत नासेरी हे हरफनमौला किशोर कुमार यांची १७१ गाणी १७ तासामध्ये सादर करून सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत.

या कार्यक्रमाची आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून नासेरी यांनी आता पर्यंत ५१ गाणी त्यांनी सादर केली आहेत. यामध्ये ‘अंग्रेजी मैं कहते हैं,’ ‘पल भर के लिए कोई हमे’, ‘हम दोनों दो प्रेमी’, ‘निले निले अंबर में’, ‘अरे रफ्ता रफ्ता’ अशी गाणी सादर करून रसिक प्रेक्षकाची मने जिंकली.

यावेळी प्रशांत नासेरी म्हणाले की, ‘सचिन तेंडुलकर यांचा वेगळया पध्दतीने वाढदिवस साजरा करावा, अशी इच्छा सुरुवातीपासून होती. आज सकाळपासून गाण्यास सुरुवात केली. तब्बल १७ तासात १७१ गाणी सादर करण्यासाठी मागील चार महिन्यापासून तयारी केली आहे.’ यातून एक वेगळा आनंद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. सचिनला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देताना ‘लिम्का बुक ऑफ’ सह अनेक विक्रम मोडीत निघणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.