पुणे : ‘तुकोबा हे शेतकऱ्यांचे कवी आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे राजे महाराष्ट्रात होऊन गेले. मात्र, त्यानंतर अजूनही महाराष्ट्राला शेतकरी राजा मिळाला नाही. शेतकऱ्यांचा राजा म्हणून निवडले जाणारे पुढारी शेतकऱ्यांप्रति असलेली बांधीलकी विसरतात. उद्योगपती, व्यापारी अशा वेगवेगळ्या घटकांशी या राजकीय नेत्यांचे हितसंबंध जोडले जातात,’ अशी खंत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी मंगळवारी व्यक्त केली.
विदिशा विचार मंचातर्फे डॉ. मोरे यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कोहिनूर समूहाचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल, सहकार भारतीचे पुणे महानगर बँकिंगप्रमुख डॉ. केतन जोगळेकर, मंचाच्या संचालक ममता क्षेमकल्याणी, नितीन जळूकर या वेळी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘आजही शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत. शेतकरी सरकारवर अवलंबून राहू शकत नाही. आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल, हे विठ्ठल रामजी शिंदे यांनी १९२७ मध्ये भरलेल्या पहिल्या शेतकरी संमेलनात सांगितले होते. ते आजही लागू होते. कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या हक्काचे आहे ते सरकारकडे मागायचे. मात्र, आपले प्रश्न सोडवण्यासाठी सरकारवर अवलंबून राहता येणार नाही.’
‘शेतकऱ्यांना कधीही कर्ज बुडवण्याची इच्छा नसते. त्यांच्यासाठी कर्ज बुडवणे पापाचे काम असते. कर्ज फेडल्यामुळे स्वर्गात जाता येते आणि न फेडल्यास नरकात जाऊ, अशी भीतीही शेतकऱ्यांमध्ये असते. मात्र, उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या सरकारच्या कृषी धोरणांमुळे शेतकरी मेटाकुटीस येत आहे,’ असे भालेराव यांनी सांगितले.
‘शेतकरी जीवन ही माझ्या कवितेची भूमिका आणि जातकुळी आहे. जे जगलो ते, सभोवतालचे शेतकऱ्यांचे जगणे आणि शेतकऱ्याची संस्कृती शब्दांत मांडत राहिलो. महात्मा जोतिबा फुल्यांनी मांडलेला शेतीचा दृष्टिकोन पुढे नेणारे शेतकरी नेते शरद जोशी यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या कवितेला धार आली. त्याच दृष्टिकोनातून मीही व्यक्त होत गेलो. ही नव्या धाटणीची कविता होती,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
वैष्णवी पठारे यांनी मानपत्राचे वाचन केले. उत्तरार्धात इंद्रजित भालेराव, डॉ. अर्चना कुडतरकर, सागर काकडे, कुमार गोरक्ष, नीलेश खडके, विलास ठाकूर, अतुल दुधाणे, सुजित कदम, पार्थ भेंडेकर, गिरीश जंगमे, निखिल सुक्रे, संजना बसवंते, ऋषी पांडे, वैभव जावळे, ओमराज शेवाळकर, अस्मिता मराठे यांनी कवितांचे सादरीकरण केले.
