पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या साधू वासवानी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पाहणी करून आढावा घेतला. या उड्डाणपुलाचे काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त राम यांनी दिले.

या उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूक पोलीस, रेल्वे विभाग यांच्याशी समन्वय साधून महापालिकेला काम करावे लागत आहे. हा प्रकल्प अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून, महापालिका प्रशासनाने प्रत्येक महिन्याला या कामाचा आढावा घेऊन डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त राम यांनी दिले. या वेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, प्रकल्प विभागाचे प्रभारी मुख्य अभियंता दिनकर गोजारे, पथ विभागाचे प्रमुख राजेश बनकर, उपायुक्त आशा राऊत, संतोष वारुळे, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी पोलिसांचा वाहतूक विभाग, तसेच रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात येत आहे. साधू वासवानी चौकातील रेल्वे मार्गावरील सुमारे ५४ मीटर लांबीचा ‘ओपन वेब गर्डर रेल्वे स्पॅन’ हा प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचा व तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक भाग आहे. या ठिकाणी दररोज २४० हून अधिक रेल्वेगाड्यांची वाहतूक होते. त्यामुळे रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता कायम ठेवून कामाचे नियोजन केले जात असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

जलवाहिनीचे स्थलांतर

या ठिकाणी अस्तित्वात असलेली एक मीटर व्यासाची जुनी ओव्हरहेड जलवाहिनी कामामध्ये अडथळा निर्माण करीत होती. या जलवाहिनीचे स्थलांतर करून ती भूमिगत पद्धतीने टाकण्यात आली. तसेच, रेल्वे स्पॅनच्या ठिकाणी असलेले विद्यमान ओव्हरहेड स्ट्रक्चर काढण्याचे काम प्रकल्प विभागामार्फत नव्याने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून करण्यात येत आहे. एका आठवड्यात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वाहतूक पोलीस, रेल्वेच्या परवानगीमुळे विलंब

साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. वाहन चालकांना या परिसरातून ये जा करताना त्रास होणार नाही. त्यामुळे या पुलाचे काम महापालिकेने लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प केला होता. पोलिसांच्या वाहतूक शाखेची तसेच रेल्वे विभागाचा ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्याने हे काम उशिरा सुरू झाले. पोलीस आणि रेल्वे प्रशासन यांचे एनओसी नंतर कामाला वेग आला असून पुढील काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या एनओसी साठी पाठपुरावा केला जात असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.