देशातील कोट्यवधी ग्राहकांसाठी डिजिटल पेमेंटमुळे दैनंदिन व्यवहार अधिक जलद, सोपे आणि सुलभ झाले आहेत. ही सुविधा मोठ्या प्रमाणात वाढत असताना ग्राहकांनी याबाबत अधिक जागरूक राहणे, आवश्यक बनू लागले. वारंवार घडणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना पाहिल्यास ग्राहकांनी सजग राहणे आता काळाची गरज बनले आहे. त्यामुळे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ( एनपीसीआय) सुरक्षित व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना अतिशय सोप्या परंतु महत्वाच्या पाच टिप्स दिल्या आहेत.
महत्वाच्या टिप्स
१) पैसे देण्यापूर्वी नेहमी तपासा : कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी स्क्रीनवर दिसणारे नाव आधी तपासा. तुम्ही पैसे देऊ इच्छित असलेली व्यक्ती किंवा व्यवसाय तोच असल्याची खात्री करा. खात्री करण्यासाठी काही सेकंद घेतल्याने चुका टाळण्यास मदत होऊ शकते.
२) फक्त विश्वसनीय पेमेंट ॲप्स आणि वेबसाइट वापरा : अधिकृत आणि लोकप्रिय ॲप्स किंवा वेबसाइटद्वारे पेमेंट करा. ॲप्स डाउनलोड करू नका किंवा तुम्हाला माहीत नसलेल्या किंवा विश्वास नसलेल्या लोकांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
३) तुमचा पिन किंवा ओटीपी शेअर करू नका : तुमचा यूपीआय पिन, ओटीपी किंवा बँक तपशील हा खासगी आणि गोपनीय आहे. हा तपशील मागणारी व्यक्ती बँक किंवा पोलीस किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयातील असल्याचे सांगत असली तरी तो कधीही शेअर करू नका.
४) कोणत्याही पेमेंटसाठी घाई करू नका : तुम्हाला कोणी तत्काळ पेमेंट करण्यास किंवा तुमचे तपशील तातडीने शेअर करण्यास सांगत असेल, तर थोडा वेळ थांबून विचार करा. तुम्ही त्यांना काही वेळ थांबण्यासाठी सांगू शकता नेहमी सांगू शकता. तुम्ही थोडा वेळ घ्यायला काहीच हरकत नसते.
५) पेमेंट अलर्ट सुरू ठेवा आणि ते वारंवार तपासा : तुमच्या पेमेंटसाठी एसएमएस आणि ॲप सूचना सुरू करा. प्रत्येक सूचना काळजीपूर्वक वाचा. काहीही चुकीचे दिसल्यास ताबडतोब तुमच्या बँकेशी किंवा पेमेंट ॲपशी संपर्क साधा.
तक्रार कशी करावी?
काही चांगल्या सवयींचा अवलंब करून, प्रत्येक ग्राहक त्याच्या डिजिटल सुरक्षितता निश्चित करू शकतो. जागरूकता आणि जबाबदार वापरासह डिजिटल पेमेंट हे दैनंदिन जीवनाचा एक विश्वासार्ह आणि अविभाज्य भाग बनू शकते. ग्राहक हे संशयास्पद क्रमांकाची तमार राष्ट्रीय सायबर क्राइम हेल्पलाइनवर १९३० किंवा दूरसंचार विभागाकडे https://sancharsaathi.gov.in/sfc/ या संकेतस्थळावर करू शकतात. ग्राहकांनी तकार करण्याआधी संशयास्पद क्रमांकावरून आलेले मेसेज सांभाळून ठेवावेत, त्यांचे स्क्रीनशॉट घ्यावेत आणि कागदपत्रांची छाननी करा. तुम्हाला तक्रार दाखल करण्याची आवश्यकता असल्यास याची अधिकाऱ्यांना मदत होईल, असे आवाहन एनपीसीआयने केले आहे.
