पुणे : उत्पादनात सुमारे वीस टक्के घट, अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे लागवडीत झालेली घट आणि श्रावण महिन्यांतील उपवासांमुळे मागणीत झालेली वाढ, यांचा एकत्रित परिणाम म्हणून साबूदाण्याच्या दरात तेजी आली असून, किरकोळ बाजारात साबूदाणा दहाच दिवसांत प्रति किलो सरासरी दहा रुपयांनी वधारला असून, चागल्या दर्जाच्या साबुदाण्याची ६३ ते ६५ रुपयांनी आणि मध्यम दर्जाच्या साबूदाण्याची ६० ते ६२ रुपयांनी किरकोळ विक्री होत आहे. मागील तीन वर्षांपासून साबूदाण्याच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे तमिळनाडूतील सेलम परिसरातील शेतकऱ्यांनी अपेक्षित दर मिळत नाही, म्हणून साबूदाणा कंदाची लागवड कमी आहे. शिवाय मागील हंगामात साबूदाणा कंदांचे उत्पादनही कमी प्रमाणात निघाले आहे. त्यामुळे बाजारात काही प्रमाणात साबूदाण्याचा तुटवडा आहे. आजपासून श्रावण महिना सुरू होत आहे. त्यानंतर येणाऱ्या गणेशोत्सव आणि नवरात्रामुळे साबूदाण्याची मागणी वाढणार आहे. बाजारातील मागणी वाढल्यामुळे आणि उत्पादनात घट झाल्यामुळे साबूदाणा तेजीत आला आहे. होलसेल बाजारात मध्यम प्रतीचा साबूदाणा पाच हजार प्रति क्विंटल होता, तो आता सहा हजारांवर गेला आहे. चांगल्या दर्जाचा साबूदाणा ५५०० ते ५७०० रुपये होता, तो आता ६४०० ते ६५०० रुपयांवर गेला आहे. त्यात पाच टक्के वस्तू आणि सेवा कराची भर घातल्यास ग्राहकांना किरकोळ खरेदी करताना दर्जानुसार ६० ते ६५ रुपये मोजावे लागणार आहेत.  सेलममध्ये मराठी लोकांसाठी होते उत्पादन तमिळनाडूतील सेलम जिल्हा आणि आंध्र प्रदेशाच्या काही भागात साबूदाणा कंदाची लागवड मोठय़ा प्रमाणात होते. आंध्र प्रदेशातील साबूदाणा फारसा दर्जेदार नसल्यामुळे हा साबूदाणा स्टार्च म्हणून वापरला जातो. सेलम जिल्ह्यात तयार होणारा साबूदाणा दर्जेदार असल्यामुळे येथील प्रक्रिया उद्योगात तयार होणारा साबूदाणा प्राधान्याने खाण्यासाठी वापरला जातो. उपवासासाठी साबूदाण्याची खिचडी, साबूदाणा वडा, खीर आदी पदार्थ प्रामुख्याने महाराष्ट्रातच खाल्ले जातात. अलिकडे गुजरात आणि उत्तर भारतातही उपवासासाठी साबूदाणा खाल्ला जात आहे. मात्र, त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. सेलम भागात राज्यातील व्यापाऱ्यांचे प्रक्रिया प्रकल्पही आहेत. त्यामुळे सेलममधील शेतकरी महाराष्ट्रातून मागणी असल्यामुळेच साबूदाणा कंद पिकवितात आणि प्रक्रिया करतात, अशी माहिती साबूदाण्याचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली.

उत्पादनातील घट, श्रावण महिन्यामुळे मागणीत झालेली वाढ आणि पाच टक्के जीएसटी कर आदी कारणांमुळे साबूदाण्याच्या दरात प्रति किलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे. श्रावणानंतर गणेशोत्सव आणि नवरात्रीमुळे उपवासाच्या पदार्थाची मागणी कायम राहणार आहे. त्यामुळे साबूदाण्यासह उपवासाच्या सर्वच पदार्थाच्या दरात तेजी राहणार आहे.

– आशिष दुगड, व्यापारी, पुणे बाजार समिती

वरई, राजगिराही महागला

वरई मागील वर्षी ९५ ते १०० रुपये प्रति किलो होती. आता वरई १०८ ते ११२ रुपये प्रति किलो झाली आहे. वरईत भेसळ होत नसल्यामुळे आणि पोष्टिक तृणधान्य म्हणून प्रचार-प्रसार होत असल्यामुळे वरईची मागणी सातत्याने वाढत आहे. राजगिरा तसा दुर्लक्षित होता. पण, आता राजगिऱ्याला मागणी वाढत आहेत. त्यामुळे मागील वर्षी ६० ते ७० रुपये प्रति किलो असणारा राजगिरा आता १०५ ते १०८ रुपये किलोंवर गेला आहे, अशी माहिती व्यापारी आशिष दुगड यांनी दिली आहे.